राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन
schedule21 May 25 person by visibility 320 categoryक्रीडा

▪️डी वाय पाटील ग्रुपकडून पाच लाखांची मदत; स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाला बळ
कोल्हापूर : व्ही पावर इंटरनॅशनल पावर लिफ्टिंग अकॅडमी, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २० मे २०२५ रोजी शिवाजी विद्यापीठातील श्री राजमाता जिजाऊ कन्व्होकेशन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. ही स्पर्धा पाच दिवस चालणार असून २५ मे रोजी सांगता समारंभ होणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी डी. वाय. पाटील ग्रुपकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. यामुळे स्पर्धेच्या भव्य आणि यशस्वी आयोजनाला मोठे बळ मिळाले आहे.
या बाबत डी वाय पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार सतेज डी. पाटील यांनी सांगितले की, "क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांना पाठिंबा देणे ही सामाजिक बांधिलकी आहे. खेळांमुळे युवकांमध्ये केवळ शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच तर मानसिक ताकदही विकसित होते. आम्ही दिलेली मदत ही फक्त क्रीडा संस्कृती बळकट करण्याचा एक सकारात्मक प्रयत्न आहे."
स्पर्धेचे आयोजक, व्ही पावर इंटरनॅशनल पावर लिफ्टिंग अकॅडमी यांनी डी वाय पाटील ग्रुपच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
यावेळी डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने, डॉ. एस. व्ही. बनसोडे, श्री विजय शिंदे, श्री मनीष रणभिसे, श्री सिद्धार्थ बंसल, श्री अनिल मुळीक व इतर मान्यवर ,स्पर्धक उपस्थित होते.