जागतिक मृदा दिनानिमित्त चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करुया उपक्रमाचे आज जिल्ह्यात आयोजन
schedule04 Dec 25 person by visibility 35 categoryराज्य
कोल्हापूर : जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी संपूर्ण जगामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1 जुलै 2025 रोजी कृषि दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत हेक्टरी 125 टन शाश्वत ऊस उत्पादकता वाढ अभियानाचा शुभारंभ झाला. हेक्टरी 125 टन शाश्वत ऊस उत्पादकता वाढ अभियानाचा एक भाग म्हणून जागतिक मृदा दिना निमित्त चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करुया हा उपक्रम 5 डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किमान 300 गावांमध्ये आयोजित करण्यात येत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने मृद आरोग्य पत्रिका ही महत्वाकांक्षी योजना राज्यात सन 2015-16 पासून राबविण्यात येत आहे. या पथदर्शी प्रकल्पांतर्गत गावांमध्ये जमीन आरोग्य पत्रिका आधारित प्रात्यक्षिके शेतकरी मेळावे आयोजित करण्यात आले. सन 2025-26 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून 26 हजार शेतक-यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात खालील बाबींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने माती नमुने काढणे. मृद आरोग्य पत्रिकांचे वाचन व मार्गदर्शन करणे. मृद आरोग्याचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगणे. जमीन सुपीकता निर्देशांक, जमीन आरोग्य पत्रिका आधारित खतांच्या संतुलित वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय खत वापराचे फायदे या बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
गावांमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माती परीक्षणाचे महत्व समजावून सांगून जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन. महाकृषि विस्तार AI App च्या माध्यमातून पिक निहाय खत व्यवस्थापन व इतर योजनांबाबत मार्गदर्शन. गावातील प्रगतशील शेतकरी, रीसोर्स बँक मधील शेतकरी, आत्मा शेती सल्लागार समिती, शासकीय यंत्रणेकडे नोंदणीकृत गट, आत्मा अंतर्गत शेतकरी मित्र, कृषि सखी हे देखील उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. गावस्तरावर कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून आपल्या विभागाच्या विविध योजना /उपक्रम बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व विभागातील शेतकरी, युवक व महिला तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.