वनकायदे, जैवविविधता व ड्रोन प्रशिक्षणावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात
schedule18 Feb 26 person by visibility 186 categoryराज्य
कोल्हापूर : वनविभागामार्फत वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक या क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी विविध विषयांवरील एकदिवसीय कार्यशाळा दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत राजर्षी शाहू सभागृह, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस वनविभागाच्या ११ क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सकाळच्या सत्रात निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र धोंगडे यांनी वनकायदे तसेच भारतीय न्याय संहिता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वनअधिकारी व कर्मचाऱ्यांची वनकायद्यांबाबत उजळणी होण्याबरोबरच भारतीय न्याय संहितेतील नव्या तरतुदी व त्यांची अंमलबजावणी याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. मागील सहा महिन्यांपासून शिकार व चोरटी तोड-वाहतूक संदर्भात दाखल होत असलेल्या प्रकरणांबाबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसनही या सत्रात करण्यात आले.
दुपारच्या सत्रात पर्यावरण जीवशास्त्रज्ञ सुहास वायंगणकर यांनी वणवा व्यवस्थापन व जैवविविधता संवर्धन विषयावर मार्गदर्शन केले. दरवर्षी फेब्रुवारी ते जून अखेर सुरू होणाऱ्या वणवा हंगामात जंगलातील वन्यजीव, वनसंपदा व जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांविषयी माहिती देत प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर त्यांनी भर दिला. त्यानंतर कोल्हापूर वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी मानव-वन्यजीव संघर्ष तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची लक्षणे ओळखण्याबाबत सचित्र व चित्रफितींद्वारे मार्गदर्शन केले.
डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी विद्यालय, माहिती व तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक प्रांजल फराकटे यांनी ड्रोन हाताळणी व त्यासंबंधित तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले. मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच दुर्गम भागातील माहिती संकलनासाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सायंकाळच्या सत्रात स्टेट बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर येथील अधिकाऱ्यांनी आर्थिक साक्षरतेबाबत माहिती देत वनकर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आर्थिक सुविधा व सुरक्षा उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या शेवटी सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांनी सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांचे आभार मानले. सदर कार्यशाळेसाठी उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.