डांबरी प्लांट सुरू करण्याच्या हालचालींना वेग; अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यानी प्रकल्पाची केली संयुक्त पाहणी
schedule26 Nov 25 person by visibility 44 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने डांबरी प्लांट सुरू करण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळाली असून अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांनी आज हलसवडे येथील प्लांटची संयुक्त पाहणी केली. शहरातील रस्ते दुरुस्तींची कामे वेळेत झाली पाहिजेत यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने या प्रकल्पात गांभीर्याने लक्ष घालून प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यात भाड्याने घेऊन हा प्लांट सुरू केला जाणार आहे, त्यानंतर दोन महिन्यांनी महापालिका स्वत:चा प्लांट उभारणार आहे. यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी तातडीने प्लॅन्ट भाडयाने घेण्यासाठी निविदेस मान्यता देऊन पाठपुरावा केला आहे.
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, पॅचवर्क आणि नवीन रस्त्यांच्या कामांमध्ये गती येण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सलग दोन बैठकीत स्पष्ट सूचना केल्यानंतर या हालचालींना गती मिळाली आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवारी हलसवडे येथील डांबरी प्लांटच्या यंत्रसामग्री, उत्पादन क्षमता, तांत्रिक व्यवस्था व आवश्यक सुविधांचा आढावा घेतला.
महापालिकेचा डांबरी प्लांट सुरू झाल्यानंतर शहरातील रस्ते दुरुस्तीचे काम वेगाने पार पडणार असून बाहेरील कंत्राटदारांवर अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. लहान-सहान रस्त्यांची कामे, पॅचवर्कची कामे आता वेळच्यावेळी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर रस्ते विकासासाठी आवश्यक असलेले डांबर व गरम मिक्स उपलब्ध झाल्याने कामांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या दीर्घकाळच्या तक्रारींचा विचार करता रस्ते प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाय साधण्याचा प्रयत्न महापालिकेच्या पातळीवर सुरू आहे.
महापालिकेच्या वतीने संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून पुढील आठवड्याभरात प्लांट सुरू होण्याची शक्यता आहे. प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते दुरुस्तीला अधिक गती मिळणार आहे.