कोल्हापूर : प्रभाग क्र. ४ मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी, २० कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
schedule10 Sep 26 person by visibility 113 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ४ मध्ये स्वच्छता व्यवस्थेची पाहणी करताना उपायुक्त परितोष कंकाळ यांनी आज सकाळी ताराबाई पार्क येथील सासने मैदान येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी केली. यावेळी सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेण्यात आली.
तपासणीदरम्यान सतत गैरहजर राहणे, कामात दिरंगाई करणे, गणवेश न परिधान करणे, डमी कर्मचारी लावणे तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार काम न करणे अशा प्रकारांमध्ये आढळून आलेल्या एकूण २० कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये गणवेश न परिधान केलेल्या ११ कर्मचाऱ्यांना, ओळख परेडसाठी विनापरवाना गैरहजर राहिलेल्या ७ कर्मचाऱ्यांना 1000 हजार तसेच गैरहजर असलेल्या गणेश परिधान न केलेल्या 2 स्वच्छता कर्मचारी प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला. संबंधित दंडाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्याचे आदेश उपायुक्त परितोष कंकाळ यांनी दिले. यावेळी प्रभाग समिती सभापती विशाल चव्हाण, नगरसेविका सौ. दिपाली घाडगे, सौ. स्वाती कांबळे तसेच आरोग्य निरीक्षक विकास भोसले उपस्थित होते.
प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेबाबत उपायुक्त कंकाळ यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या. प्रभागात कोणत्याही ठिकाणी कचरा साचणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देत घरगुती कचरा संकलनासाठी घंटागाड्या वेळेत प्रभागात पोहोचवून घराघरातून कचरा संकलन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. घंटागाड्या वेगाने न फिरवता प्रत्येक घरातून कचरा संकलित करावा, तसेच ज्या घंटागाड्यांचे स्पीकर बंद आहेत त्यांची तातडीने दुरुस्ती करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिले. त्याचबरोबर धुर फवारणी व औषध फवारणी कर्मचाऱ्यांचे प्रभागनिहाय नियोजन करुन त्याची सक्त अंम्मलबजावणी करण्याच्या सूचना देऊन स्वच्छतागृहांच्या दैनंदिन साफ सफाईबाबत सूचना दिल्या.