ऊस शेतीत AI तंत्रज्ञानाची कमाल ; एकरी १०२ मे. टन उत्पादनाचा विक्रम
schedule29 Nov 26 person by visibility 137 categoryउद्योग
◼️आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या जैनापूर येथील शेतात यशस्वी प्रयोग; उत्पादनवाढीसह पाणी, खते आणि खर्चातही बचत
जयसिंगपूर : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास पारंपरिक शेतीचे चित्र बदलू शकते, याचा प्रत्यय शिरोळ तालुक्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ऊस शेतीत एकरी तब्बल १०२ मेट्रिक टन उत्पादन घेण्यात यश आले आहे. आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या जैनापूर येथील शेतात हा यशस्वी प्रयोग करण्यात आला असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादन वाढविण्याचा नवा मार्ग शेतकऱ्यांसमोर खुला झाला आहे.
शरद सहकारी साखर कारखाना लि., नरंदे यांच्या पुढाकारातून व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कारखान्याचे चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस शेतीची पाहणी केली.
जैनापूर येथील गट क्रमांक २२१ मधील एक हेक्टर क्षेत्रात आडसाली हंगामात CO-86032 या ऊस जातीची लागवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, हे क्षेत्र पूर्वी हलक्या प्रतीचे व खडकाळ स्वरूपाचे होते. या ठिबक सिंचनाचा वापर करून देखील ६५ ते ७० मे टन मिळत असलेले उत्पादन हे आज AI तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी १०२ मे. टन उत्पादन मिळविणे शक्य झाले आहे. या प्रयोगातून उत्पादनवाढीबरोबरच उत्पादन खर्चातही बचत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या तंत्रज्ञानामध्ये अमेरिकास्थित मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे अॅपच्या साहाय्याने विश्लेषण केले जाते. त्यानुसार पिकाची सद्यस्थिती, पाण्याची गरज, खतांचे प्रमाण आणि संभाव्य रोग-किडींची माहिती मिळते. खोडकिडा, लोकरी मावा, तांबेरा आणि पांढरी माशी यांसारख्या समस्यांवर प्रतिबंधात्मक उपाय सुचविले जातात. वेदर स्टेशनच्या मदतीने तापमान, पाऊस, ढगाळ वातावरण आणि हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन फवारणीची योग्य वेळही निश्चित करता येते.
ठिबक सिंचनामुळे सुमारे ५० टक्के पाण्याची बचत होत असून, औषधे व अन्नद्रव्ये थेट पिकाच्या मुळांपर्यंत पोहोचविणे शक्य होत आहे. त्यामुळे पाणी, खते आणि औषधांचा अनावश्यक वापर टाळता येतो.
शरद सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू अशा तिन्ही हंगामांत AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन आहे. हलक्या, मध्यम आणि चांगल्या प्रतीच्या जमिनींमध्ये तसेच विविध ऊस जातींवर प्रयोग सुरू आहेत. या तंत्रज्ञानासाठी हेक्टरी २५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून १८ हजार २५० अनुदान, शेतकरी वाटा रुपये ६७५० व इतर साहित्याच्या अपेक्षित खरेदीसाठी केडीसीसी बँकेकडून ९००० रुपये अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतऱ्यावर एकही रुपया खर्च पडत नाही. ऊस पिकासाठी आवश्यक ह्युमिक अॅसिड, फुलविकल ॲसिड, बायोझाईम, ॲमिनो असिड, लाईम सल्फर, ऑरगॅनिक कार्बन, फोर स्ट्रोक, सिलिकॉन स्टिकर, मायक्रोन्यूट्रियंटस्, कॅल्शियम ऑक्साईड, ईएम सोल्युशन, ऑरगॅनिक फॉस्फेट, नीमकरंज ऑइल आदी कृषी निविष्ठा गुणवत्ता पूर्वक आणि माफक दरामध्ये शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जैनापुरच्या शरद कृषी महाविद्यालयाचे राहुल दुग्गे मो : ९९२१३११६१५ यांच्याशी साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*‘शेतीत तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज’*
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, उत्पादन खर्च कमी व्हावा आणि उपलब्ध पाणी व जमिनीचा अधिक कार्यक्षम वापर व्हावा, या उद्देशाने ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रयोग राबविण्यात येत आहे. जैनापूर येथील हलक्या व खडकाळ जमिनीत एकरी १०२ मे. टन उत्पादन मिळणे ही समाधानाची बाब आहे. हा प्रयोग केवळ एका शेतापुरता मर्यादित न ठेवता कारखाना कार्यक्षेत्रातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय शेती पद्धती आणि योग्य मार्गदर्शन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शरद कारखाना कटिबद्ध आहे.
-आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर