खबळजनक : कोल्हापुरातील व्यापाऱ्यास पिस्तुलाचा धाक
schedule13 Aug 24 person by visibility 366 categoryगुन्हे
कोल्हापूर : शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीतील व्यापारी संदीप विश्वनाथ नष्टे (वय ५६) आणि त्यांच्या कुटुंबीयांना मास्क परिधान केलेल्या अज्ञाताने पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावले. हा प्रकार सोमवारी (दि.१२) रात्री साडेनऊ ते सव्वादहाच्या दरम्यान घडला. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
व्यापारी नष्टे हे शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीत कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अंदाजे सहा फूट उंचीचा, सुमारे ४० वर्षे वयाचा तरुण नष्टे यांच्या दारात आला. संदीप नष्टे यांचेच घर आहे काय? अशी विचारणा करून तो थेट घरात घुसला. तोंडावर मास्क असल्याने त्याचा चेहरा ओळखू येत नव्हता.
पोलिस असल्याचे सांगत घरात प्रवेश करत तुमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार आहे. तुम्ही तडजोड करून प्रकरण मिटवणार आहे, की वाढवणार आहे? अशी त्याने विचारणा केली. बराच वेळ यावरून नष्टे आणि संशयितामध्ये चर्चा सुरू होती. तक्रारीबद्दल सविस्तर माहिती आणि नाव विचारताच त्याने वाद घालायला सुरुवात केली.
त्याचवेळी संशयिताने कमरेचे पिस्तूल काढून संदीप नष्टे यांच्या दिशेने रोखून धरले. प्रकरण मिटवले नाही तर तुम्हाला जड जाईल. कोणालाही सोडणार नाही, असे म्हणत तो धमकावू लागला. पिस्तूल पाहताच नष्टे कुटुंबीय भयभीत झाले. पण कुटुंबातील अन्य सदस्यांनी घातलेला गोंधळ पाहून संशयिताने पलायन केले.