संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये क्रीडा महोत्सव २०२५–२६ चे जल्लोषात उद्घाटन
schedule29 Dec 25 person by visibility 80 categoryक्रीडा
कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये क्रीडा महोत्सव २०२५–२६ चे उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते नारळ वाढवून उत्साहात करण्यात आले. यावेळी इन्स्टिट्यूट मधील सर्व विभागांचे विभाग प्रमुख, क्रीडा समन्वयक प्रा. संदीप पाटील, प्रा. प्राजक्ता विभुते, विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी श्रेयश जाधव, तन्मय उमाजे, विविध विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. विराट गिरी यांनी शैक्षणिक इंजिनिअरिंग अध्यापनासोबतच क्रीडा महोत्सवाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्र अत्यंत आवश्यक असून खेळामुळे शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि मानसिक शारीरिक तंदुरुस्ती विकसित होते, असे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबत खेळाचे संतुलन राखल्यास विद्यार्थी जीवनात यशस्वी ठरतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात सांघिक आणि वैयक्तिक खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये विजयी ठरणाऱ्या संघाची जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड करण्यात येणार असून त्या संघांना इन्स्टिट्यूट मार्फत आवश्यक ते प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासनही डॉ. गिरी यांनी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व क्रीडाप्रेमींना शुभेच्छा देत त्यांनी स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन झाले असे जाहीर केले.
शैक्षणिक क्रीडा महोत्सवास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे.





