‘शिक्षण वाचवा, देश वाचवा!’; गारगोटीत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी
schedule10 Oct 26 person by visibility 129 categoryशैक्षणिक
गारगोटी : शिक्षण आणि शाळा टिकल्या पाहिजेत, या मुख्य उद्देशाने गारगोटी शहरात आज विद्यार्थी आणि नागरिकांच्या वतीने भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली. 'शिक्षण वाचवा मंच, भुदरगड'च्या वतीने आयोजित या फेरीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील विविध ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
जोतिबा चौक ते हुतात्मा स्मारक या मार्गावर ही जनजागृती फेरी मोठ्या उत्साहात पार पडली. या फेरीत गारगोटीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक (ज्युनियर कॉलेज), वरिष्ठ महाविद्यालये तसेच डी.एल.एड. आणि बी.एड. कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
हातात विविध संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी परिसर दुमदुमून टाकला. ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘गाव तिथे शाळा’, ‘प्रत्येक शाळेत शिक्षक असलाच पाहिजे’ आणि ‘शिक्षण वाचवा, देश वाचवा’ अशा जोरदार घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
या रॅलीमध्ये केवळ विद्यार्थीच नव्हे, तर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणारे शिक्षक-शिक्षिका, माजी शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण वाचवा मंचचे सम्राट मोरे, के. के. भारतीय, प्रा. राजेंद्र यादव, राजेंद्र यादव, स्वप्नील साळुंखे आणि कॉमरेड रामभाऊ कळंबेकर यांच्यासह विविध मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लावून रॅलीचे नेतृत्व केले.