जिजाऊ बसमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल : आमदार यड्रावकर
schedule30 Aug 26 person by visibility 104 categoryराज्य
▪️कुरुंदवाड आगारात ५ नवीन ‘जिजाऊ’ बस दाखल
जयसिंगपूर : प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून आधुनिक बससेवा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. कुरुंदवाड आगाराला मिळालेल्या नव्या ‘जिजाऊ’ बसमुळे तालुक्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून, ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल,असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
कुरुंदवाड आगारात तब्बल ५ अत्याधुनिक ‘जिजाऊ’ बस दाखल झाल्या असून, या बससेवेमुळे शिरोळ तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार यड्रावकर यांच्या हस्ते या नव्या बससेवेचा शुभारंभ जयसिंगपूर बसस्थानकात करण्यात आला.
आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, कुरुंदवाड आगारांतर्गत जयसिंगपूर, शिरोळ, नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड ही चार प्रमुख बसस्थानके येतात. संपूर्ण तालुक्यातील प्रवाशांची दैनंदिन वाहतूक मोठ्या प्रमाणावर एसटी महामंडळाच्या बससेवेवर अवलंबून आहे. नृसिंहवाडी हे धार्मिक क्षेत्र तसेच जयसिंगपूर हे व्यापारी केंद्र असल्याने या मार्गावर प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता नव्या बस दाखल झाल्याने विविध मार्गांवर फेऱ्या वाढविण्यासह वाहतूक सेवा अधिक सुरळीत होणार आहे.
या ‘जिजाऊ’ बसची रचना प्रवाशांच्या सोयीचा विचार करून करण्यात आली आहे. बसमध्ये ३ बाय २ (3x2) आसन व्यवस्था असून, एकूण ५५ आसने उपलब्ध आहेत. गाडीच्या मागील बाजूस प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा ठेवण्यात आली असून, आधुनिक सोयी-सुविधांमुळे प्रवास अधिक सुखकर होणार आहे. सुरक्षितता, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव सुधारण्यास मदत होणार आहे.
नव्या बसमुळे विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यापारी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध मार्गांवर प्रवास करताना मोठी सोय होणार आहे. तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता भविष्यात आणखी चांगली बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले.
यावेळी जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, उपनगराध्यक्ष आडके मॅडम, नगरसेवक विजय मोरे, आगार व्यवस्थापक बिस्मिल्ला सय्यद विभागीय कर्मचारी अधिकारी घोरपडे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक आठवले, सहाय्यक वाहतूक अधीक्षक सद्दाम शेरकर, वाहतूक निरीक्षक संतोष चव्हाण, वाहतूक नियंत्रक मुल्ला शब्बीर, हेड मेकॅनिकल उत्तम भाट, प्रवासी मित्र निखिल कनीरे, प्रवासी संघटना अध्यक्ष दत्तवाड, जयसिंगपूरचे वाहतूक नियंत्रक प्रमोद हेरवाडे, नवनाथ वाकतकर, राहुल बंडगर, शरद आलासे, संभाजी मोरे यांच्यासह चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.