ग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद
schedule08 Oct 26 person by visibility 146 categoryमहानगरपालिका
◼️कॅम्पमध्ये ७८ नागरिकांकडून १९ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागामार्फत शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी, कळंबा व पाडळी या ग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी मोरया हॉल, बोंद्रे नगर आणि साळोखे हॉल, कळंबा येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ८७ नागरिकांनी अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी अर्ज सादर केले.
यापैकी ७८ नागरिकांनी प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची रक्कम भरली असून, आज एकूण १९ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी नागरिकांना शहर पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयातही अर्ज सादर करता येणार आहे. सदर कॅम्प आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आला. हा कॅम्प उपायुक्त नागेंद्र मुतकेकर , जल अभियंता जयेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
महापालिकेच्या वतीने ग्रामीण भागातील सर्व अनधिकृत नळ कनेक्शन धारकांना आवाहन करण्यात येते की, दि. १३ ऑक्टोबर २०२६ अखेर आपले अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. निर्धारित मुदतीत नळ कनेक्शन अधिकृत न केल्यास संबंधित अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर नियमानुसार २५ हजार रुपये दंडात्मक कारवाईसह फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
नागरिकांनी महापालिकेच्या या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन आपले अनधिकृत नळ कनेक्शन विहित मुदतीत अधिकृत करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.