संविधानाच्या आकलनासाठी मूलभूत संरचना समजून घेणे महत्त्वाचे: डॉ. विलास शिंदे
schedule12 Dec 25 person by visibility 53 categoryराज्य
कोल्हापूर : भारतीय संविधानाच्या आकलनासाठी मूलभूत संरचना समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, गांधी अभ्यास केंद्र आणि समाज कल्याण विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम.उषा योजने अंतर्गत “भारतीय राज्यघटना: मूलभूत संरचना सिद्धांताचा विकास” या विषयावर संख्याशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात आयोजित एकदिवसीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी डॉ. शिंदे बोलत होते. यावेळी संचालक डॉ.कृष्णा पाटील, समन्वयक डॉ.प्रकाश पवार व उपकुलसचिव विनय शिंदे उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, संविधानातील सरनामा, धर्मनिरपेक्षतेचे तत्व हे सर्व भारतीय यांना एकत्र ठेवण्याचे काम करीत आहे.संविधानात सांगितलेले सरनामा, कल्याणकारी राज्य, मूलभूत हक्क आणि कर्तव्याची जाणीव, समानतेचे तत्व, न्यायालयीन प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया ही मुळापासून वाचली पाहिजे.
भारतीय संविधानाची तीन महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. हे संविधान आम्ही तयार केले असून स्वत:प्रत अर्पण केले आहे. दोन निसर्गाचे संवर्धन करण्याचे तत्व भारतीय संविधानात सांगितले आहे. म्हणून हे संविधान फक्त भारताचे नव्हे तर जगाचे संविधान व्हावे. आणि तीन विज्ञाननिष्ठ आणि विवेकशील समाज निर्माण करणे या तत्वाचा ही समावेश भारतीय संविधानात केला आहे.
तत्पूर्वी, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक डॉ.श्रीराम पवार म्हणाले की, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये मुलभूत संरचना अंतर्भूत आहे.न्यायालयाने दिलेल्या विविध निर्णयानुसार भारतीय संविधानतेची मुलभूत संरचना अधिक बळकट झाली आहे. सत्ता समजून घेणारा सिद्धांत हा राज्यघटनेच्या मुळाशी आहे.लोकशाही ही सामान्य माणसांच्या हितासाठी आणि त्यांच्या अधिकारासाठी आहे. अध्यक्षस्थानी मराठी अधिविभागाचे डॉ.रणधीर शिंदे होते.
शारदाबाई पवार अध्यासन समन्वयक प्रा.डॉ.भारती पाटील “भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान“ या विषयावर बोलताना म्हणाल्या की, भारतीय राज्यघटना ही केवळ एक दिवसात तयार झाली नसून त्यामागे अनेक वर्ष सुरु असलेली राष्ट्रीय चळवळ,त्यातील नेत्यांचे विचार व भारतीय सामाजिक स्थिती या सर्व गोष्टींचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडला आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेची मुलभूत राज्यघटनेची चौकट सर्वाना मान्य होते. अध्यक्षस्थानी मानव्यविद्या शाखा अधिष्ठाता प्रा,डॉ.एम.एस.देशमुख होते.
बेळगाव येथील राणी पार्वती देवी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.एच.पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी विश्वकोश मंडळाचे संतोष गेडाम व अनिल घाडगे यांनी शोधनिबंधांचे वाचन केले. डॉ.संतोष कावडे व संदीप पाटील यांनी चर्चासत्राबाबत अभिप्राय व्यक्त केला. या चर्चासत्रासाठी दीडशे हून अधिक विद्यार्थी,शिक्षक व अभ्यासक यांनी सहभाग घेतला.
समारोपाच्या सत्राचे स्वागत व प्रास्ताविक समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी केले. डॉ.सचिन भोसले यांनी परिचय करून दिला. संचालक डॉ.कृष्णा पाटील यांनी अहवाल वाचन केले. डॉ.नगीना माळी व प्रियांका सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. विनय शिंदे यांनी आभार मानले.