मतदान जनजागृती अभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम
schedule30 Dec 25 person by visibility 85 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शहरातील विविध महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित पथनाट्य, प्रभात फेरी, मतदान शपथ, पत्रलेखन, निबंध व रांगोळी स्पर्धा, दौड आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानाअंतर्गत कमला कॉलेजच्या विद्यार्थिनींनी काल राजारामपुरी परिसरातील विविध ठिकाणी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात मतदानाची तारीख, नागरिकांनी उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडावे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराला मतदान करावे, अशा महत्वाच्या विषयांवर जनजागृती करण्यात आली. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर पथनाट्यात अनन्या जाधव, तेजल गावडे, भक्ती उतरंडे, प्राजक्ता साळुंखे, दुर्गा घोरपडे यांच्यासह एकूण 30 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या विद्यार्थिनींना प्रा. डॉ. सुजय पाटील, प्रा. श्रीमती पी. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तर प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी प्रोत्साहन दिले.
त्याचप्रमाणे महावीर महाविद्यालय, शाहू कॉलेज व शहाजी कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी जनजागृती रॅलीचे आयोजन केले. तसेच नाईट कॉलेज, डी. आर. के. कॉमर्स कॉलेज, विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज व शाहू कॉलेज येथे विद्यार्थ्यांकडून मतदान विषयक शपथ घेण्यात आली.
सदर मतदार जनजागृती अभियान कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी, उपआयुक्त किरण कुमार धनवाडे तसेच प्राचार्य बाबासो उलपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.





