विशाळगड प्रकरणः कोल्हापुरात एमआयएमची पावसात निदर्शने; हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी
schedule19 Jul 24 person by visibility 502 categoryराज्य

कोल्हापूर : गजापूरवर हल्ला केलेल्या हल्लेखोरांना अटक
झालीच पाहीजे, या मागणीसाठी ऑल इंडिया मज्लिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) च्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात निदर्शने करण्यात आली. वरील घटनेची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत करावी अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी, इलियास कुन्नुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना याबाबतचे निवेदन दिले. विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अन्य चुकीच्या गोष्टींना आमचा अजिबात पाठिंबा नाही. मात्र गडावरून परतताना गजापुरातील हल्ल्यामुळे नागरिकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
त्यामुळे हल्लेखोरांवर कडक कारवाई करा, कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, हल्ल्यात बाधीत झालेली धार्मिक स्थळे व घरांसाठी शासनाने नुकसान भरपाई द्यावी, हल्ल्यातील जखमी व्यक्तींना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारतर्फे द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी मोहसीन हकीम, सिराज नदाफ, सलमान नाईकवाडे, इरफान बिजली, जुबेर पठाण, फिरोज डांगे यांच्यासह मुस्लीम नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔴 राज्यभरात मुस्लिम समाजाची आंदोलने
विशाळगडावरील हिंसेप्रकरणी (एमआयएम) चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर मध्ये आंदोलन केले आहे. यादरम्यान हिंसाचाराविरोधात इम्तियाज जलील हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आंदोलनावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. त्यामुळे पोलीसांकडून मोठ्या संख्येने फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर बीडमधील तालुक्यांनध्ये देखील मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आले आहे. राज्यात विविध जिल्हाधिकार्यालय पक्षातर्फे निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले. यामुळे मुस्लिम समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेला पाहण्यास मिळाला.
🔴 विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती
मुंबई उच्च न्यायालयाने विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाई स्थगिती दिली आहे. विशाळगडावरील आतिक्रमणाबाबत आज (दि.१९) उच्च न्यायालयात सुनावणी झाली." भर पावसात घरांवर हातोडा का?" असे म्हणत न्यायालयाने विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात सुरु असलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे.