कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : आज मतदान, उद्या समजणार करेक्ट कार्यक्रम
schedule15 Jan 26 person by visibility 60 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या दहाव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी सर्व मतदान यंत्रणा शहरातील ५९५ मतदान केंद्रांवर सक्रिय झाली आहे. एकूण २० प्रभागांतील ८१ जागेसाठी ही निवडणूक होत असून ३२७ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत दरम्यान प्रचार काळामध्ये नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अनुभवास मिळाल्या. आज होणाऱ्या मतदानातून उद्या मतमोजणी अर्थात उद्या दिसणार मतदारांनी केलेला करेक्ट कार्यक्रम असे म्हणावे लागेल. दरम्यान आज सकाळी मतदान केंद्रावरती मतदानास प्रारंभ झाला असून मतदारांच्या रांगा काही ठिकाणी दिसू लागल्या आहेत.
गुरुवारी सकाळपासून मतदार आपला हक्क बजावण्यासाठी बाहेर पडतील. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी दहा तास निवडणूक मतदान प्रक्रिया सुरू राहील. संध्याकाळी साडेपाच वाजता जेवढे मतदार केंद्रावर रांगेत उभे असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे विलंब झाला म्हणून मतदारांचा हक्क डावलला जाणार नाही. पण, मतदारांनी साडेपाच वाजता रांगेत उभे असणे आवश्यक आहे.
कोल्हापूर शहराच्या विकासाची संधी तसेच महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती सोपवायच्या याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. गतवेळच्या निवडणुकीत ६८.८५ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतदानाची यावेळी ही टक्केवारी ७५ टक्क्याच्या पुढे नेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे मात्र कोल्हापुरांचा उत्साह पाहता मतदानाची टक्केवारी साध्य होईल असे दिसते दरम्यान आज सकाळी मतदानास सुरुवात झाली असून मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या आहेत.