पोलांडच्या संसदीय शिष्टमंडळाची कोल्हापूर भेट: वळीवडे पोलीश संग्रहालय प्रकल्पाला गती
schedule09 Aug 26 person by visibility 110 categoryसामाजिक
कोल्हापूर : पोलंड आणि भारताच्या सामायिक इतिहासातील एका सुवर्ण अध्यायाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आल्याची भावना पोलंड प्रजासत्ताकाच्या सन्माननीय संसदीय शिष्टमंडळाचे स्वागत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्यक्त केली.
पोलंडच्या संसद सदस्या व पोलंड-भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा किंगा गायेव्स्का यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय पोलिश शिष्टमंडळाने कोल्हापूरला भेट दिली. या शिष्टमंडळाचे स्वागत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि युवराज संभाजीराजे यांनी केले. यावेळी महापौर रूपाराणी निकम, महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅस्मिन, संयोगिताराजे छत्रपती, मुंबई येथील पोलंडचे वाणिज्य दूत तोमास्क विएलगोमास, नवी दिल्ली येथील पोलीस इन्स्टिट्यूटच्या संचालक व मंत्री मालगोझावेयसिस, श्री तोकर्नल गायकवाड, कर्नल वाजपेयी, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ . राठोड म्हणाले, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडवर जर्मनी आणि सोव्हिएत युनियन या दोघांनीही दोन्ही बाजूंनी आक्रमण केले होते. हजारो पोलिश नागरिकांना अकल्पनीय यातना आणि संकटांचा सामना करावा लागला. परंतु, मानवी सहानुभूतीच्या आणि प्रयत्नांच्या बळावर ते आपल्या देशातून बाहेर पडू शकले. हे पोलिश निर्वासित सोव्हिएत युनियनमधून इराणमार्गे अखेर ब्रिटीश भारतामध्ये आले. भारताने त्यांचे स्वागत निर्वासित म्हणून नाही, तर सन्माननीय पाहुणे म्हणून केले.
सुमारे पाच हजार पोलिश पुरुष, महिला आणि बालके कोल्हापूरच्या वळीवडे येथे आली. तेथे तत्कालीन छत्रपती घराणे आणि कोल्हापूरच्या दिलदार जनतेने त्यांचा स्वीकार केला व त्यांना आश्रय दिला. त्यांनी येथे आपले आयुष्य नव्याने उभारले, आपल्या श्रद्धा आणि परंपरा जपल्या. आपल्या मुलांना शिक्षण दिले आणि पिढ्यानपिढ्या टिकून राहतील, अशा आठवणी निर्माण केल्या.
युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांनी या भावनिक बंधाचे रूपांतर दोन्ही राज्यांमधील एका आधुनिक भागीदारीत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलंडला दिलेल्या अनेक भेटींच्या माध्यमातून तीन पिढ्यांपासून चालत आलेला हा परस्परसंबंध आज दोन्ही सरकारांच्या सर्वोच्च पातळीवरील भागीदारीत विकसित झाला आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
पोलंडचे पंतप्रधान या वर्षाच्या उत्तरार्धात भारताला भेट देणार आहेत. ही केवळ एक राजनैतिक भेट नसून इतिहास, मानवता आणि मैत्रीचे पुनर्मिलन आहे.
भारत आणि पोलंड हे संयम, धैर्य, राष्ट्रीय अभिमान आणि "मानवतेच्या सर्वात कठीण काळातही करुणा आणि सहानुभूतीचा विजय होतो" या विश्वासाने एकमेकांशी जोडलेले आहेत, असे सांगत भारत पोलंड चिरंतन मैत्रीचा सुगंध या स्मरण समारंभात त्यांनी राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी यांनी पोलंडहून आलेल्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.
यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी तत्कालीन पोलीश नागरिकांच्या राहणीमानाची माहिती देत संग्रहालय विकसित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी बोलताना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी वळवडेचा इतिहास हा केवळ कोल्हापूर किंवा पोलंडचा नसून संपूर्ण मानव जातीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले या वारशाचे जतन करण्यासाठी पोलंडने दाखविलेल्या बांधिलकीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली तसेच वळवडे येथे जागतिक दर्जाचे मानवता आणि शांतता आणि मैत्रीचे संग्रहालय उभारण्याचा निर्णय व्यक्त केला.
या कार्यक्रमांमध्ये पोलीस शिष्टमंडळाने वळीवडे येथे उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयास त्यांच्या संग्रहातील तत्कालीन अनेक ऐतिहासिक वस्तू व छायाचित्रे प्रदान केली.
अपेक्षा निरंजन या वळवडे येथे वास्तव्यास असलेल्या पोलीस कुटुंबाच्या वंशज यांनी मनोगत व्यक्त करून पोलंड मधून आलेल्या सर्व मान्यवरांचे उपस्थित यांचे विशेषतः संभाजी राजे छत्रपती आणि संयोगिता राजे छत्रपती यांचे मनःपूर्वक आभार मानले.