SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
माविमच्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करु : जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुखकोल्हापूर महापालिकेची स्थायी समिती आक्रमक; बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा, गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्तीचे आदेशकोल्हापूर : बाजार गेट, पान लाईन परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाईमहिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय: गडहिंग्लजमध्ये भागीरथी मल्टीस्टेटच्या पहिल्या शाखेचा दिमाखात शुभारंभ!के.एम.टी.च्या भंगार साहित्याच्या ई-लिलावातून ५२.३१ लाखांची बोलीकोल्हापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई: शेल कंपनीच्या नावाखाली म्युल बँक खाती चालवणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, २१ लाखांचा मुद्देमाल जप्तकोल्हापुरात 'गोल्ड हंटर्स गँग'वर मोक्का अंतर्गत कारवाई; जुना राजवाडा पोलिसांची मोठी कारवाईकल्पनेपासून उद्योगापर्यंत: केआयटी-आयआरएफच्या कार्यशाळेत नवउद्योजकांना मिळाला यशाचा मूलमंत्र!भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं झाले मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर६६७ दूध संस्थांच्या मतदान पात्रतेवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब; 'गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांकडून गडहिंग्लजमध्ये आनंदोत्सव

जाहिरात

 

माविमच्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करु : जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख

schedule04 Sep 26 person by visibility 95 categoryराज्य

◼️सांगरुळ मधील कोल्हापुरी चप्पल युनिटचे उद्घाटन
• पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सुमारे सव्वा कोटींचा प्रकल्प सुरु
* जिओ टॅग मानांकन असलेल्या कारागिरांकडून होणार चप्पल निर्मिती

कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सांगरुळ येथे सुरु करण्यात आलेल्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले.

   महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) कोल्हापूर अंतर्गत अस्मिता साधन केंद्र बालिंगा, जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत जिओ टॅग मानांकन असलेल्या कारागिरांकडून चप्पल निर्मिती होत असलेल्या या युनिटचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सांरुळच्या सरपंच शितल बदाम खाडे, माविमचे पुणे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार सिद्धराम माशाळे, माविमचे पुणे विभागीय सल्लागार विलास बच्चे, माविम कोल्हापूरचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे, सहायक संचालक (माहिती) वृषाली पाटील, कुंभी कासारी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे तसेच अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र बालिंगाच्या अध्यक्षा सारिका चौगले, व्यवस्थापक विद्या गुरव, प्रकल्प सल्लागार अनुराग कोकितकर, प्रकल्प व्यवस्थापक सौरभ पोवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटातील महिलांचा सन्मान करण्यात आला.

   कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सांगरुळ मध्ये बचत गटातील महिलांना कोल्हापुरी चप्पल बनवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन कोल्हापुरी चप्पल निर्मिती युनिट तयार करण्यात आले आहे. हे युनिट उभारण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने कोल्हापूरची ओळख असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल ची दर्जेदार पद्धतीने निर्मिती व बचत गटातील महिलांचे सक्षमीकरण होण्याच्या हेतूने जिल्हा नियोजन समितीतून 80 लाख 26 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. तर सीएमआरसी तून 23 लाख 77 हजार रुपयांचे अर्थसहाय्य आणि नवतेजस्विनी गटाचे 25 लाख रुपयांचे कर्ज असे एकूण 1 कोटी 29 लाख रुपये खर्च करुन हे कोल्हापुरी चप्पल युनिट उभारण्यात आले आहे.

कोल्हापूरची पारंपरिक कलाकौशल्ययुक्त कोल्हापुरी चप्पल देश विदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास या युनिट मुळे मदत होईल. ग्राहकांना आवडतील अशा आधुनिक डिझाईनच्या चप्पल बरोबरच बेल्ट, पाकीट, पर्स अशा चामडीच्या वस्तूही या विक्री दालनातून वर्षभर उपलब्ध होणार आहेत. घरगुती पातळीवर ग्रामीण कारागिरांना लागणाऱ्या उपवस्तू या प्रकल्पातून योग्य व वाजवी दराने निर्मिती करुन मिळणार आहेत. यामुळे त्यांचे श्रम, वेळ व पैशाची बचत होणार आहे. या ठिकाणी आधुनिक व अद्ययावत मशिनरी असल्याने कमी वेळेत जास्त उत्पादन निर्मिती झाल्याने रोजगार व लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी विक्री केंद्र सुरु करण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण कोल्हापुरी चप्पल निर्मिती प्रकल्पाच्या सुरुवातीला 50 महिलांपासून 150 महिला व कुटुंबाना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकल्प सल्लागार अनुराग कोकितकर व प्रकल्प व्यवस्थापक सौरभ पोवार यांनी दिली. 

यावेळी सिद्धराम माशाळे, विलास बच्चे, कुंदन शिनगारे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. महिलांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येत असून या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. सांगरुळ येथील युनिट मधून तयार होणाऱ्या उत्कृष्ट दर्जाच्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करु, असे वृषाली पाटील यांनी सांगितले. कुंभी कासारी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे यांनी मनोगत व्यक्त करुन प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes