यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले : माजी प्राचार्य गणपतराव कणसे
schedule12 Mar 25 person by visibility 128 categoryसामाजिक

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर रहावे यासाठी विशेष प्रयत्न केले, असे प्रतिपादन कराड येथील टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कै.यशवंतराव चव्हाण अध्यासन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या वतीने भारताचे दिवंगत उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त 'यशवंतराव चव्हाण : संस्काराचे अमृतकुंभ' या विषयावर माजी प्राचार्य गणपतराव कणसे (कराड) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी माजी प्राचार्य कणसे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख उपस्थित होते.
माजी प्राचार्य कणसे म्हणाले, व्यक्ती संपत्तीवर मोठा होत नाही तर त्यांनी अंगीकारलेल्या संस्कारावर मोठा होतो. हे यशवंतराव चव्हाणांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत दाखवून दिले आहे. ते आपल्या संस्काराच्या भक्कम पायांवर उभे राहिले म्हणून आज आपण सगळे त्यांचे स्मरण करतो. व्यक्ती पेक्षा देश मोठा ही पवित्र भावना यशवंतराव चव्हाणांनी लोकांच्या मनामध्ये रूजविली. देवराष्ट्र सारख्या एका दूर्गम भागात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. आई, वडील आणि गुरूजनांकडून मिळालेल्या संस्कारूपी शिदोरीच्या जोरावरच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सहकार, कला-क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. शिक्षण क्षेत्रामुळे सर्व क्षेत्रांला ऊर्जा प्राप्त होते याचे भान त्यांना होते. कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी ते आग्रही होत आणि म्हणूनच प्रसंगी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्यासही ते मागे-पुढे पाहिले नव्हते. सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्या निर्णयामुळे प्रचंड क्रांती झाली. महाराष्ट्र ही भारत देशाची प्रयोगशाळा ठरते ही सगळी किमया यशवंतराव चव्हाण यांची आहे. आई, वडील आणि गुरूजनांचा नेहमी सन्मान राखावे असे ते म्हणत. जीवसृष्टी चिरंतन काळापर्यंत अबाधीत राहण्यासाठी आजच्या तरूणांनी पर्यावरण आणि पाणी प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत माजी प्राचार्य कणसे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख म्हणाले, दुर्गम भागातील व्यक्ती आपल्या संस्काराच्या जोरावर देशाच्या प्रगतीमध्ये आणि जडणघडणीमध्ये मोठे योगदान देण्याचे महत्वपूर्ण कार्य यशवंतराव चव्हाण यांचे कडून घडले. राज्याची, देशाची प्रगती व्हावी, सर्वसामान्य माणसाचा विकास व्हावा, अशा पध्दतीची नितीमत्ता त्यांनी बाळगली आणि त्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. सहकार क्षेत्रामध्ये केलेले त्यांचे कार्य देशाला दिशादर्शक ठरले.
यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हसते करण्यात आला. या विविध स्पर्धेतील विजेत्यांची नांवे अनुक्रमे अशी: पोस्टर स्पर्धा - वरूण अमृते, नेहा शिंदे, सुकन्या निकम. निबंध स्पर्धा - नेहा शिंदे, सुकन्या निकम, श्रेया म्हापसेकर. रिल स्पर्धा - आरपीता सावंत, आदित्य देसाई, प्रथमेश पाटील.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ.नितीन माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.उर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले. यशवंतराव चव्हाण अध्यासनाचे समन्वयक डॉ.उमेश गडेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ.कविता वड्राळे, डॉ.संतोष सुतार यांचेसह विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट येथे यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्धाटन माजी प्राचार्य डॉ.गणपतराव कणसे (कराड) आणि मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख यांनी केले. या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.तुकाराम चौगुले, क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ.शरद बनसोडे, माजी प्राचार्य गणपतराव कणसे, डॉ.संतोष सुतार, डॉ.उमेश गडेकर, डॉ.कविता वड्राळे, डॉ.वैशाली भोसले, डॉ.गजानन साळुंखे, डॉ.परशुराम वडार, डॉ.दादा ननावरे, डॉ.प्रताप खोत, डॉ.उर्मिला दशवंत यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.