केआयटी मध्ये ‘ स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२५’ चे आयोजन अंतिम फेरीसाठी देशभरातील २८ संघ सहभागी होणार
schedule05 Dec 25 person by visibility 108 categoryशैक्षणिक
भारताची उच्चशिक्षित विद्यार्थी शक्ती ही विकसित भारताचा आधार आहे. या विद्यार्थी शक्तीच्या माध्यमातून देशभरातील विविध विषयातील अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात हा उद्देश विश्वास ठेवून भारत सरकारने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या उपक्रमाचे आयोजन सुरू केलेले आहे. याचे सकारात्मक फायदेही दिसत असल्यामुळेच औद्योगिक क्षेत्रही याला जोडले जात आहे.
भारत सरकारच्या शिक्षण विभागाचा इनोव्हेशन सेल आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २५ चे आयोजन कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयांमध्ये दि ८-९ डिसेंबर २५ रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.चंद्रशेखर बिरादार,संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्लोबल गीन ग्रोथ,बंगळूरू यांच्या हस्ते तर श्री.प्रसन्न डोईजड डिलिव्हरी हेड, नेलसॉफट यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमासाठी श्री.संदीप जोशी, व्हाईस प्रेसिडेंट ह्यूमन रिसोर्स टाटा ऑटो-कॉम्प सिस्टीम लिमिटेड हे मुख्य अतिथी असणार आहेत.ही अंतिम फेरी आहे.६ प्रश्नांचे ६ विभाग केले असून प्रत्येक विभागातील विजेत्या संघाला भारत सरकार कडून १.५० लाखाचे रोख पारितोषिक मिळणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात एसबीआय फाउंडेशन, टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून कॉड, नॉलेज पार्टनर म्हणून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि पर्सिस्टंट या दिग्गज कंपन्या सहभागी आहेत. या सर्व कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आकाशवाणी व दूरदर्शन न्युज हे असणार आहेत. अशी माहिती संस्थेचे संचालक व या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ मोहन वनरोट्टी यांनी दिली.
केआयटी नोडल सेंटर वर होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी कृषी मंत्रालयाने दिलेल्या ६ प्रश्नांवरती विद्यार्थी आपल्या ज्ञानाच्या आधारे उत्तर शोधूत ते सादर करणार आहेत. सहा समस्या एकत्रितपणे तेलबिया पिकांच्या उत्पादन, आयात, आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी डिजिटल साधने तयार करण्यावर केंद्रित आहेत. पहिली समस्या पाम तेलाच्या शुल्काचा आयात आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम अंदाज लावण्यासाठी एक सिम्युलेटर विकसित करण्याबद्दल आहे. दुसरी समस्या एआय प्लॅटफॉर्म तयार करण्याबद्दल आहे जे मोठा डेटा आणि हवामान अंदाज वापरून तेलबिया पिकांचे उत्पादन ऑप्टिमाइझ करेल. तिसरी समस्या शेतकऱ्यांना नफा आणि सरकारी पाठिंबा दर्शवून तेलबिया पिकवण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक ॲप तयार करण्याबद्दल आहे. चौथी समस्या तेलबिया शेतकऱ्यांसाठी किमतीतील चढउताराची जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी आणि बाजारातील चढउतारांपासून बचाव करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म डिझाइन करण्याबद्दल आहे. पाचवी समस्या तेलबिया शेतकऱ्यांना खरेदीदार आणि उप-उत्पादनांसाठी प्रोसेसरशी जोडण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याबद्दल आहे. शेवटी, सहावी समस्या तेल पाम शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल सपोर्ट सिस्टम तयार करण्याबद्दल आहे जी सल्ला, विमा आणि सूक्ष्म-क्रेडिट पर्याय देईल. ही स्पर्धा ८ डिसेंबर ला सकाळी ८ वा. सुरू होणार असून सलग ३६ तासानंतर ही स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेमध्ये ११ राज्यातून २८ महाविद्यालयातून २८ टीम सहभागी होत आहेत. १०७ विद्यार्थी ६१ विद्यार्थिनी मिळून १६८ स्पर्धक, ३० मार्गदर्शक या स्पर्धेत उपस्थित राहणार आहेत.६ विभागातून होणाऱ्या स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व अनुभवी अशा १८ मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले आहे अशी माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रा.अजय कापसे यांनी दिली.
केआयटीनेही या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी तयारी केलेली आहे. १०० प्राध्यापक ११० विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या एकत्रित प्रयत्नातून सहभागी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत.स्पर्धकांची भोजन व्यवस्था, प्रवास व्यवस्था, निवास व्यवस्था त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास वैद्यकीय मदत अशा एक ना अनेक गोष्टींची पूर्तता दर्जेदारपणे करण्या बाबत केआयटी कटिबद्ध आहे असा विश्वास सहसंयोजक प्रा.प्रवीण गोसावी यांनी व्यक्त केला. या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली उपाध्यक्ष श्री सचिन मेनन सचिव श्री दीपक चौगुले यांचे मोठे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले लाभत आहे.