बेंगळुरू स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी, ११ जणांचा मृत्यू
schedule04 Jun 25 person by visibility 320 categoryदेश

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन बनलेल्या आरसीबी संघाचा जल्लोष शोकात बदलला. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. उत्सवादरम्यान, स्टेडियमच्या आत आणि बाहेर गर्दी अचानक अनियंत्रित झाली, ज्यामुळे गोंधळ उडाला. अनेक लोक चिरडले गेले आणि डझनभर जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की, चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ३३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, स्टार खेळाडूंना पाहण्यासाठी दोन ते तीन लाख लोक जमले होते.
कर्नाटक सरकारने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
१८ वर्षांत प्रथमच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला.