एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या विपणन सहकार्यामुळे ‘चेतना’च्या उत्पादनांची ४ दिवसांत ४२ हजारांची विक्री; विद्यार्थ्यांच्या सेवाभावातून दिवाळी झाली गोड
schedule28 Oct 24 person by visibility 228 categoryउद्योग
कोल्हापूर : समाजातील सक्षम नागरिकांनी अक्षम नागरिकांना सहकार्याचा हात पुढे केला, तर सामाजिक-आर्थिक विषमता दूर होण्याबरोबरच सामाजिक सौहार्द प्रस्थापित होण्यासही मदत होते, याचे बोलके उदाहरण शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. कोल्हापुरात बौद्धिक अक्षम मुलांसाठी कार्यरत असलेल्या चेतना अपंगमती विकास संस्थेच्या चेतना उत्पादन केंद्रातील मुलांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी एमबीएच्या विद्यार्थ्यांनी आपली विपणन व विक्री कौशल्यांचे सहाय्य पुरविले आणि अवघ्या चार दिवसांत ४२ हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री करण्यात यश मिळविले.
शिवाजी विद्यापीठाच्या एम.बी.ए. अधिविभागातील विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख उपक्रमांतर्गत चेतना अपंगमती विकास संस्थेसोबत हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला. या उपक्रमाचा उद्देश 'चेतना उत्पादन केंद्र' यांच्या उत्पादनांचा प्रचार करणे आणि विक्री वाढविणे होता. चेतना अपंगमती विकास संस्था गेली ३९ वर्षे कोल्हापुरात बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून संस्थेमध्ये चेतना विकास मंदिर ही बौध्दिक अक्षम मुलांची शाळा, चेतना व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र हे उदयोग केंद्र चालविण्यात येते. संस्थेत सध्या २२० विदयार्थी असून विविध स्वरूपाच्या शिक्षण आणि पुनर्वसनात्मक उपक्रमातून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. संस्थेच्या कार्यशाळेत मुले विविध वस्तूंचे उत्पादन करतात आणि त्यांच्या विक्रीतून काही हिस्सा या मुलांना विद्यावेतन म्हणून देण्यात येतो. या मुलांना आपल्या पायावर उभे करण्याकरिता असे प्रयत्न करण्यात येतात.
यंदा चेतनाच्या या उपक्रमाला जोड मिळाली ती शिवाजी विद्यापीठातील एम.बी.ए. अधिविभागाच्या विदयार्थ्यांच्या कौशल्यांची. सध्या दिवाळीच्या निमित्ताने चेतना संस्थेच्या विद्यार्थ्यांनी 'चेतना स्पेशल गिफ्ट बॉक्स', आकर्षक पणत्या व आकाशकंदील, उटणे, साबण, धुप-अगरबत्ती, लक्ष्मीपूजन पुडा, सुवासिक अभ्यंग तेल आदी विविध उत्पादने तयार करून विक्रीसाठी उपलब्ध केली. एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांनी ही उत्पादने व वस्तू विक्रीसाठी २१ ऑक्टोबरपासून शिवाजी विद्यापीठाच्या शिवबाजार, हॉटेल के-स्क्वेअरजवळील स्थानक आणि जिल्हा परिषद मैदान येथे ठेवली. या वस्तूंची प्रभावीपणे विक्री करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक पध्दतीने विक्री योजना आखून डिजीटल मार्केटींगही केले. परिणामी, अवघ्या चार दिवसांत एकूण ४२ हजार रुपयांच्या उत्पादनांची विक्री करण्यात या विद्यार्थ्यांना यश आले. एमबीएच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम ना नफा, ना तोटा या तत्तवावर राबविल्याने त्यांचे व्यवस्थापन कौशल्य सेवाभावी कार्यासाठी उपयोगी ठरले.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना एम.बी.ए. अधिविभागाच्या संचालक डॉ. दीपा इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले, तर डॉ. तेजश्री घोडके, जयश्री लोखंडे, डॉ. परशराम देवळी आणि प्रशासकीय कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.