गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ५५वे पुष्प प्रदर्शन
schedule04 Dec 25 person by visibility 58 categoryसामाजिक
कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ वे पुष्प प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे संपन्न होणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या हरित महोत्सवात विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्याने तसेच बगीचांना लागणारे सर्व साहित्य पुरवणारे स्टॉल्स यांची रेलचेल असेल. शहरवासीयांना या प्रदर्शनात केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर पुणे, सांगली, बेळगाव अशा शहरांमधून बागेसाठी लागणारे नवनवीन साहित्य जसे कुंड्या, स्टॅन्ड, रोपे, कंद, खते, हत्यारे वगैरे बघण्याचा व खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे.
या प्रदर्शनाची सुरुवात शनिवार दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता पुष्प स्पर्धेने होईल. ज्यामध्ये स्पर्धक आपल्याकडील फुललेले गुलाब, झेंडू, निशिगंध, जरबेरा अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती प्रदर्शनात मांडतील. तज्ञ परीक्षकांकडून त्याचे परीक्षण होईल व त्यानंतर पुष्प प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ सकाळी साडे दहा वाजता होईल. उद्यान स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांचा बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे माननीय मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी अध्यक्ष परितोष कंकाळ , तसेच
विशेष अतिथी म्हणून सत्यजित कदम, राजेंद्र दोशी, शांतादेवी डी. पाटील, हे उपस्थित असतील.
📌संध्याकाळच्या सत्रात
▪️प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित स्किट स्पर्धा घेण्यात येईल. यानंतर कोल्हापुरातील तरुणाई ज्या उत्कंठावर्धक स्पर्धेची वाट पहात असते अशा सळसळत्या तरुणांच्या कल्पनांचा अविष्कार दाखविणाऱ्या बोटॅनिकल फॅशन शो सादर होईल. या स्पर्धांमध्ये तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी सिनेतारिका जुई पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, सचिव सुप्रिया भस्मे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळच्या गुलाबी थंडीत लहान थोरांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या विशेष उत्साहपूर्ण स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध एचपी हॉस्पिटॅलिटि इंडस्ट्रीजचे हिराकांत पाटील असतील. ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे हे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील. या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांची चित्रे २०२७ च्या कॅलेंडरसाठी निवडली जातील.
संध्याकाळच्या सत्रात पृथ्वी आणि पर्यावरण' (अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट) या संकल्पनेवर आधारित लघुपट स्पर्धेतील निवडक व विजेते लघुपट पडद्यावर दाखवण्यात येतील.
प्रदर्शनामध्ये गार्डन्स क्लब आणि इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने फ्लॉवर फेस्टिवल या संकल्पनेअंतर्गत सृजनशील प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.
मार्गदर्शक म्हणून बॉम्बे ओहारा चाप्टरच्या तज्ञ मार्गदर्शकांची टीम लाभणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने अत्तरे तयार करणे, फुलांपासून सरबते तयार करणे, तसेच कागदी फुले तयार करणे यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (यू एन इ पी) ची यावर्षीची संकल्पना *प्लास्टिक प्रदूषणाचा अंत* यावर आधारित रचना, सजावट तसेच प्रात्यक्षिके यांचा सुंदर मिलाप अनुभवण्यासाठी कोल्हापूरकरांनी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस शांतादेवी. डी. पाटील,प्राजक्ता चरणे, सुभाषचंद्र अथणे, शशिकांत कदम, रवींद्र साळुंखे, डॉ. रचना संपत कुमार आदी उपस्थित होते.
▪️प्रदर्शनातील प्रमुख आकर्षणे :- १) क्लब तर्फे 6000 कापडी पिशव्यांचे वाटप
२) शाळेतील मुलांची पोस्टर व उपकरणांद्वारे प्लास्टिक प्रदूषणावर बोलकी प्रदर्शने.
यामध्ये बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल, राधाबाई शिंदे, न्यू मॉडेल, माईसाहेब बावडेकर या शाळा सहभागी होतील.
३) देशी बियाणांचे प्रदर्शन व माहिती केंद्र.
४) क्लब सदस्य श्री. अभय कोटणीस यांच्या कचऱ्यापासून खत बनवणाऱ्या उपकरणांची माहिती.
५) महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या व इतर विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग.