राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संताप
schedule30 Oct 26 person by visibility 136 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरण न राबवता महापालिकेच्या वतीने फेरीवाल्यांवर मनमानी पद्धतीने अन्यायकारक कारवाई केली जात असल्याचा आरोप करत, फेरीवाला कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात व्यवसाय बंद ठेवून भव्य मोर्चा काढण्यात आला. महापालिकेच्या या कारभाराविरोधात फेरीवाल्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
▪️बेकायदेशीर कारवाईचा आरोप: शहरातील फेरीवाले, पथविक्रेते, भाजीपाला मार्केट, केबिनधारक आणि फळविक्रेत्यांवर महापालिकेकडून बेकायदेशीर कारवाई केली जात आहे. जप्त केलेले साहित्य, हातगाडी किंवा केबिन संबंधितांना परत दिली जात नसल्यामुळे फेरीवाल्यांचे मोठे नुकसान होत आहे.
▪️अवाजवी शुल्काचा बडगा: परवानाधारक फेरीवाल्यांकडून 'क्यूआर' कार्डसाठी १००० रुपये आणि दररोज १०० रुपये शुल्क आकारण्याचे नवीन धोरण महापालिकेने सुरू केले आहे. अधिकारी नियम धाब्यावर बसवून वसुली करत असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.
▪️ भव्य मोर्चा आणि घोषणाबाजी: भवानी मंडपातून सुरू झालेला हा मोर्चा बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, आणि पानलाईन मार्गे महापालिकेवर धडकला. या वेळी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
▪️प्रमुख मागण्या आणि आंदोलनाचा इशारा:
मोर्चाच्या वतीने उपायुक्त किरणकुमार धनवडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिवाळीच्या सणात फेरीवाल्यांचा व्यवसाय चांगला चालत असल्याने या काळात त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये आणि दररोज आकारले जाणारे १०० रुपये शुल्क बंद करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. जर महापालिकेने कारवाई सुरूच ठेवली, तर तीव्र स्वरूपात आमरण उपोषण करण्याचा सज्जड इशारा फेरीवाला कृती समितीने दिला आहे.
या आंदोलनात आर.
के. पवार, नंदकुमार वळंजू, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, राजू जाधव, सोमनाथ घोडेराव, अर्जुन आंबे, रियाज काझी, किरण गवळी, विक्रांत भागोजी, विठ्ठल एडगे, दिलीप देसाई, अशोक भंडारे, निर्मला कराडे, मुमताज बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने फेरीवाले उपस्थित होते.