भूषण गवई यांच्यावरील हल्ला न्यायव्यवस्थेच्या पावित्र्यावर प्रहार : आमदार सतेज पाटील
schedule06 Oct 25 person by visibility 235 categoryसामाजिक

कोल्हापूर : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा न्यायव्यवस्थेच्या पावित्र्यावर थेट प्रहार आहे या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी न्यायमूर्ती गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात सोमवारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनीही ट्विट करुन या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला.
आमदार पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, विकृत विचारसरणी आणि अतिरेकी प्रवृत्तीमुळे प्रेरित अशा हिंसक कृतींना सभ्य समाजात स्थान नाही. गवई यांच्यावरील हल्ला हा न्यायव्यवस्थेच्या पवित्रतेवर थेट प्रहार आहे. सर्वांनी या झुंडशाही मानसिकतेचा तीव्र निषेध केला पाहिजे. न्यायसंस्था तसेच कायद्याच्या राज्याच्या समर्थनार्थ ठामपणे उभे राहिले पाहिजे.
▪️सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं निलंबन
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला. यानंतर आता बार कौन्सिल ऑफ इंडियाने वकील राकेश किशोर यांना प्रॅक्टिसमधून निलंबित केले आहे. सत्तरच्या जवळपास वय असलेल्या या वकिलाने सरन्यायाधीशांनी खजुराहो मंदिरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे तो नाराज होता. या वकिलाची चौकशी करण्यात आली. "मात्र, त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही कारण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यालयाने कोणतेही गुन्हा दाखल केला नाही.