'गोकुळ' मॅडेटनुसार सर्व नेत्यांनी सहकार्य करावे; आमदार सतेज पाटील यांचे आवाहन राजकीय घडामोडींवर भाष्य
schedule27 Oct 26 person by visibility 192 categoryराजकीय
कोल्हापूर : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि 'गोकुळ दूध संघ' यासंदर्भातील राजकीय घडामोडींवर आमदार सतेज पाटील यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. या संदर्भातील भूमिकेबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली.
मॅडेटनुसार सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, आमदार हसन मुश्रीफ , आमदार विनय कोरे , मंत्री चंद्रकांत दादा आणि आमदार चंद्रदीप नरके या सर्व ज्येष्ठ नेत्यांशी मी स्वतः चर्चा केली आहे. मॅडेट आलेला असल्याने सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार संजय मंडलिक हे कदाचित एखाद्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, गोकुळ अध्यक्ष निवडी बाबत विरोधी संचालकांनी त्यांच्या नेत्यांशी बोलण्याची सूचना केली होती. त्यानुसार अत्यंत समंजसपणाची भूमिका घेत सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी आनंदराव पाटील चुयेकर यांच्या चिरंजीवांच्या संदर्भातील निर्णयावरही त्यांनी प्रकाश टाकला. मागच्या वेळी ठरल्याप्रमाणे मंत्री हसन मुश्रीफ , आमदार विनय कोरे आणि माझी स्वतःची इच्छा होती की त्यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांना ही संधी मिळावी. आमची सर्वांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी उर्वरित नेत्यांनीही योग्य ते सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सध्या समोर येत असलेल्या ऑडिओ क्लिप आणि राजकीय वादावर बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले की, हा वाद दोन पक्षांमधील आहे. दोन वर्षांपूर्वीच्या ऑडिओ क्लिप आता बाहेर येण्यामागे नेमका काय हेतू आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. परस्पर एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप, सर्वे आणि ऑडिओ क्लिपच्या वादावर आता योग्य वेळीच भाष्य करणे योग्य ठरेल, असे सांगितले.