क्रांती चौकाने घेतला मोकळा श्वास ; शहरातील युवकांच्याकडून नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे अभिनंदन
schedule23 Jun 26 person by visibility 160 categoryउद्योग
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराचे संस्थापक राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे जनकपिता जयसिंग महाराज यांच्या पुतळ्यांचे आकर्षक नूतनीकरण व परिसराचे सुशोभीकरण तसेच शहराच्या मुख्य क्रांती चौकातील अतिक्रमण हटविल्यामुळे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव असून विविध सामाजिक, राजकीय व युवक संघटनांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
क्रांती चौक हा जयसिंगपूर शहराच्या अनेक ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय घडामोडींचा साक्षीदार राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चौकातील अतिक्रमण, वाहतुकीची कोंडी, अनधिकृत पार्किंग यामुळे नागरिक त्रस्त होते. विविध उत्सव, मिरवणुका आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांचा केंद्रबिंदू असलेल्या या चौकाला अखेर मोकळा श्वास मिळाला आहे.
नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर आणि मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या पुढाकारातून चौकातील अतिक्रमणे हटवून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. नुकतेच शाहू महाराज व जयसिंग महाराज यांच्या पुतळ्यांच्या नूतनीकरणाचे लोकार्पण करण्यात आले असून, या कामामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष आता या आकर्षक स्मारकाकडे वेधले जात आहे.
याबाबत शहरातील युवकांनी दिलेल्या अभिनंदन पत्रात म्हटले आहे की, छत्रपतींबद्दल असलेला आदर, प्रेम आणि जयसिंगपूर शहर अधिक वैभवशाली करण्याची दूरदृष्टी या उपक्रमातून दिसून येते. तसेच अतिक्रमण हटविल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागला असल्याची त्यांनी अभिनंदन पत्रात म्हटले आहे.
यावेळी कैलास देशमुख, युवराज ऊरूनकर, महेश स्वामी, दिनेश बगरगच्चे, महेश कांबळे, रोहित कोथळीकर, सुरेश जाधव, नितीन देसाई, अमित चौगुले, विनायक कदम, अमोल सरवदे, सचिन कांबळे, रमेश गायकवाड, बाळू साळुंखे, अधिक जमादार, नदीम काझी, गिरीश तेरदाळे, सुरज चौगुले, सर्जेराव भंडारे यांच्यासह शहरातील अनेक युवक उपस्थित होते.