कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविणार : बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर
schedule14 Nov 24 person by visibility 260 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवणार असल्याचे या बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. निकालातील गुणवत्तावाढीवर आणि कामकाजात ऑनलाईन पद्धतीचा वापर कसा करता येईल यावरही भर देणार असल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूर विभाग मंडळ अंतर्गत कोल्हापूर,सातारा व सांगली हे तीन जिल्हे येतात. या विभागीय मंडळाची स्थापना सन १९९२ मध्ये झाली आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्य मंडळ व विभागीय मंडळाकडून वारंवार आवाहन करूनही कॉपीचे व गैरमार्गाचे प्रकार आढळून येतात. राज्यात रत्नागिरी येथील कोकण विभागीय मंडळ कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवते. एकही कॉपी केस कोकण मंडळांतर्गत होत नाही.
राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे सहाय्यक आयुक्त म्हणून चार वर्षे कामकाज केले आहे. तेथील विविध परीक्षांमधील कामकाजाचा राज्यस्तरावरील त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. याशिवाय त्यांनी रत्नागिरी व सातारा येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून आपल्या कामाची छाप उमटली होती. डिसेंबर २०२० पासून उपसंचालक पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी पुन्हा राज्यस्तरावर पुणे येथील योजना शिक्षण संचालनालयात आतापर्यंत काम पाहिले. शासनाने १५ ऑक्टोबर रोजी त्यांची पदोन्नतीने कोल्हापूर विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या पदाचा कार्यभार १३ नोव्हेंबर रोजी त्यांनी सुधाकर तेलंग यांच्याकडून स्वीकारला आहे.
कोकणात व कोल्हापूर विभागात त्यांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून काम केले असल्याने त्या अनुभवाचा लाभ या प्रकरणी त्यांना होऊ शकतो. कार्यालयीन व परीक्षा विषयक कामकाजात ऑनलाईन पद्धतीचा अधिकारी उपयोग करण्यावर आपला भर राहील. तसेच निकालातील गुणवत्ता वाढवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले, माजी सहसचिव दत्तात्रय पोवार, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सहायक संचालक स्मिता गौड, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, योजना शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी त्यांचे स्वागत केले.