'मिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम; आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम
schedule10 Oct 24 person by visibility 411 categoryउद्योग
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी ‘कॉर्पोरेट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी नोंदणी केलेल्या युवक -युवतींसाठी कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी येथे हा उपक्रम राबवला जाणार आहे.
आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील युवक -युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी ‘मिशन रोजगार’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमातर्गत युवक -युवतींना नोकरीसाठी आवश्यक विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. याच उपक्रमातर्गत यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी रविवारी ‘कॉर्पोरेट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयोजन करण्यात आले आहे.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी येथे सकाळी ९ ते १२ या कालावधीत हा कार्यक्रम होणार असून यात तज्ञांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. नोकरीसाठी मुलाखत देण्यापूर्वी कोणती पूर्वतयारी करावी, रिझ्युम कसा तयार करावा, त्यात कोणत्या गोष्टी ठळकपणे नमूद कराव्या, मुलाखतीसाठी जाताना पोशाख कसा असावा, व्यक्तिमत्व विकासासाठीच्या टिप्स, मुलाखतीची तंत्रे आदी विविध गोष्टीबाबत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या युवक - युवतीना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी नोंदणी केलेल्या युवक -युवतींनी या कॉर्पोरेट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी उपस्थित राहून नोकरीसाठीची उत्तम कौशल्ये आत्मसात करावी असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे.