संसद मार्चवरील पोलीस कारवाईचे तीव्र पडसाद; राहुल गांधींकडून पंतप्रधान आणि दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
schedule21 Jul 26 person by visibility 108 categoryदेश
नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पक्षाच्या (CJP) वतीने संसदेवर काढण्यात आलेल्या 'चलो संसद' मार्चदरम्यान आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईचे तीव्र पडसाद उमटले आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.
देशातील शिक्षण आणि परीक्षा प्रणालीमधील कथित गैरव्यवहाराविरोधात CJP च्या कार्यकर्त्यांनी काल संसदेवर मोर्चा काढला होता. यादरम्यान दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक जण जखमी झाले होते.
या कारवाईवर संताप व्यक्त करत राहुल गांधी म्हणाले की, "युवक आपल्या भविष्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठवत असताना सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील परीक्षा प्रणाली पूर्णपणे कोलमडली असून ती वाळवीसारखी पोखरली गेली आहे."
तसेच, देशात एकीकडे उद्योगपतींच्या मुलांच्या विवाहांवर हजारो कोटी रुपये उधळले जात आहेत, तर दुसरीकडे सामान्य कुटुंबातील तरुणांना व्यवसायासाठी किंवा भविष्यासाठी साधी संधी मिळत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा ठपका ठेवत गांधींनी पंतप्रधान आणि दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.