राधानगरीत रानगव्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
schedule11 Apr 26 person by visibility 146 categoryगुन्हे
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील पालखुर्द्द येथे रानगव्याच्या हल्ल्यात ८० वर्षीय शामराव कोडिंबा कोराणे या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.
आपल्या घराचे बांधकाम सुरू असल्याने शामराव घरामागील झाडाखाली बसले होते, तेव्हा जंगलातून आलेल्या रानगव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. गव्याने छातीत शिंगे खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वन्यविभागाने हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मृत शामराव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.