पर्यावरणीय जबाबदारी आणि संसाधनांचा शाश्वत वापर हाच खरा विकासाचा पाया : डॉ. अनंतिनी नंथाकुमारण; सायबर येथे आंतरराष्ट्रीय परिषद
schedule19 Sep 25 person by visibility 97 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर), कोल्हापूर यांच्या वतीने तसेच युनिव्हर्सिटी ऑफ वावुनिया , श्रीलंका व युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मॉरिशस आणि नेपाळची कादंबरी मेमोरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट, काठमांडू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "भविष्याचे परिवर्तन व्यवस्थापन ,तंत्रज्ञान, सामाजिक परिणाम व पर्यावरणीय जबाबदारीतील यामधील नवकल्पना " या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा आज आनंद भवन, सायबर कॅम्पस येथे उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.
“भविष्याचे परिवर्तन – व्यवस्थापन, तंत्रज्ञान, सामाजिक परिणाम व पर्यावरणीय जबाबदारीतील यामधील नवकल्पना” हा या परिषदेचा मुख्य विषय सदर परिषदेमध्ये वेगवेगळ्या चार घटकावर यात 100 हून अधिक संशोधन पेपर ऑनलाइन व ऑफलाईन प्रकारामधून सादर होणार आहेत.
सदर परिषदेच्या सुरुवातीला सायबर महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. बिंदू मेनन यांच्या हस्ते प्रकाश राठोड व प्रोफेसर डॉ. अनंतनी नंथाकुमारण यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकात प्रभारी संचालिका डॉ. बिंदू मेनन यांनी परिषदेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “व्यवस्थापनाच्या पद्धतींमधील बदल, डिजिटल तंत्रज्ञानामुळे होणारे सामाजिक परिणाम, तसेच पर्यावरणीय शाश्वततेकडे जागतिक स्तरावर असलेले लक्ष – या चौघांचा सखोल अभ्यास व संशोधन करणे, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. या परिषदेमधून संशोधक व विद्यार्थी नव्या दृष्टिकोनासह समाजासमोरील आव्हानांचा अभ्यास करतील.”
आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुख्य अतिथी प्रकाश राठोड चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, कैस्प्रो ग्रुप ऑफ कंपनीज, कोल्हापूर यांनी आपल्या भाषणात उद्योग जगताच्या अनुभवातून व्यवस्थापनातील नवकल्पनांची गरज अधोरेखित केली. पुढे ते म्हणाले की जापनीज लोक हे नम्र व शिस्तप्रिय असतात. त्याचे त्यांना घरातूनच लहानपणापासून बळकडू दिले जाते आणि ते नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापर काळजीपूर्वक करतात. भारतामध्ये आपण पाणी ,वीज व इतर नैसर्गिक स्त्रोतांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करून या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती करणे गरजेचे बनले आहे. इनोवेशन म्हणजेच नाविन्यता ही अविरत प्रक्रिया आहे की ज्यामुळे वस्तूमध्ये, सेवांमध्ये , प्रक्रियेमध्ये आपण काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे. रोबोटिक्स चा उद्योग जगतामध्ये वाढलेला वापर, डिजिटल इकॉनोमी , उबर, ओला, ही त्याच इनोव्हेशन ची काही बोलकी उदाहरणे आहेत.
आज आपणास आरोग्य क्षेत्रामध्ये ड्रिप इरिगेशन , मायक्रोफायनान्स , सोलार एनर्जी या क्षेत्रामध्ये नाविन्यता पूर्ण संकल्पना वापरून नवनिर्मितीची भरपूर संधी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये चाट जीपीटी हे तंत्रज्ञान वापरत असताना मानवी कौशल्याचा वापर करणे गरजेचे आहे. डिजिटल अरेस्ट ,सायबर सिक्युरिटी ,मालवेअर प्रॅक्टिसेस ही आव्हाने आज तंत्रज्ञान क्षेत्रापुढे निर्माण झाली आहेत. त्यावेळी त्यांनी गेंबा वॉक इनोवेशन चे उदाहरण अत्यंत समर्पक भाषेमध्ये सादर केले. हिमाचल प्रदेशामध्ये झालेली ढगफुटी व वातावरणातील बदल यांचा सामना करण्यासाठी वृक्षारोपण व प्लास्टिक बॅग च्या ऐवजी कापडी बॅग्स वापरणे हे सामाजिक जबाबदारी ची भावना प्रत्येकाने जोपासणे गरजेचे बनले आहे. उद्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी आजच योग्य पर्यावरण रक्षक सकारात्मक कृती करणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटायझेशन आणि हरित तंत्रज्ञान ही भविष्यातील उद्योगजगताची मूळ दिशा ठरेल. व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञान न घेता उद्योगातील समस्यांचे प्रत्यक्ष निराकरण करण्याची क्षमता विकसित करावी. संशोधन हे फक्त पेपरपुरते न राहता ते समाजासाठी उपयोगी ठरावे, ही खरी शैक्षणिक जबाबदारी आहे.”
डॉ. अनंथिनी नंथाकुमारन यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनामध्ये पारंपरिक जलव्यवस्थापन प्रणालीचे पुनर्जीवन आजच्या काळात अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. पर्यावरणीय जबाबदारी आणि संसाधनांचा शाश्वत वापर हाच खरा विकासाचा पाया असल्याचे मत व्यक्त केले. पुढे त्या म्हणाल्या की हवामान बदल ही मोठी जागतिक आव्हाने असून त्याचा थेट परिणाम अन्नसुरक्षा व ग्रामीण जनतेवर होत आहे .
श्रीलंकेतील व्हिलेज टॅंक कॅस्केड सिस्टीम ही जलव्यवस्थापनाची शतकान व शतकांची परंपरा आज ही प्रेरणादायी आहे. श्रीलंकेमधील वाहून या या जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि यादरम्यान उभा राहिलेल्या जिद्दीची कहाणी आपल्याला शिकवण देते. पुढे त्यांनी सामाजिक परिवर्तन व आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, “जगातील प्रत्येक समाज नव्या तांत्रिक व व्यवस्थापकीय बदलांच्या टप्प्यावर आहे. संशोधकांनी स्थानिक समस्यांना जागतिक संदर्भ द्यावा. महिला सक्षमीकरण, डिजिटल समावेशकता, आणि पर्यावरणपूरक विकास या विषयांवर भविष्यातील संशोधन केंद्रीत झाले पाहिजे. कारण सामाजिक विकासाशिवाय तंत्रज्ञानाला खरी दिशा मिळणार नाही.”
डॉ. अमिताबीन रमा यांनी अँटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. ए.एस. डी हा बहुआयामी विकार असून तो व्यक्तीच्या वर्तन संवाद व सामाजिक जीवनावर परिणाम करतो. मॉरिशस मधील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका असून ए .एस .डी संबंधी अभ्यास अजूनही मर्यादित आहे.
परिषदेच्या पहिल्या दिवशी “SAJMAR जर्नल” चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. डॉ. पूजा पाटील यांनी सदर जर्नलचे चीफ एडिटर म्हणून काम केले . त्यावेळी वेगवेगळ्या विषयावर लिहिलेल्या पुस्तकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एनआयआरएफ 2025 मध्ये राष्ट्रीय स्तरावर स्थान पटकावणाऱ्या सायबर महाविद्यालयासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणखी एक मैलाचा दगड ठरली आहे. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विद्यार्थी संशोधक व इतर महाविद्यालयांमधून सहभागी झालेले प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर परिषदेचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ए . यु. गायकवाड व प्राध्यापिका सोनाली सदरे यांनी केले
इंजि. प्रा. डी. एस. माळी यांनी आभार प्रदर्शन केले. सायबर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रणजित शिंदे, सेक्रेटरी सीए. एच. आर. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऑर्गनायझेशन कमिटी व प्राध्यापकांच्या सहभागामुळे परिषदेच्या पहिल्या दिवसाचे सत्र यशस्वीरीत्या पार पडले.