🟠 आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा येथे जुनी पेन्शनसंदर्भात शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक
कोल्हापूर: जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही काँग्रेसची पहिल्यापासूनची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात जुनी पेन्शन योजनेसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाला एकत्र करणे माझी जबाबदारी आहे. त्यामुळे ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढून कोल्हापुरातून जुनी पेन्शन लागू करण्याच्या लढयाला सुरूवात करूया असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी शिक्षकांना दिले.
आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा येथे जुनी पेन्शनसंदर्भात शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. 'जो जुनी पेन्शन देगा वही राष्ट्र मे राज्य करेगा' अशा घोषणा देण्यात आल्या.
आमदार पाटील म्हणाले, देशभरातील पाच राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करून इतर राज्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्र राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचा शाश्वत आधार जुनी पेन्शन आहे. गेल्या ७० वर्षात शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या जोरावरच देश प्रगतीपथावर गेला आहे. त्यामुळेच १२० कोटी लोकसंख्या असली तरी देश आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे जुनी पेन्शनसाठी लढा उभारण्याची आता योग्य वेळ आली आहे. २७ तारखेले राज्याच्या अधिवेशनात जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात लक्षवेधी मांडून, राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करण्याची मागणी करणार आहे. ४ मार्च रोजी कोल्हापुरात मोर्चा काढून राज्याच्या अधिवेशनात जुनी पेन्शनचा विषय मंजूर करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधूया.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशनात जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. जुनी पेन्शन लागू केली तर राज्य दिवाळखोरीत निघेल असे उत्तर दिले. देशभरात महाराष्ट्र राज्य उत्पन्नात एक नंबरला असून फक्त ४ टक्के रक्कम जूनी पेन्शनवर खर्च केली जाते. विद्यमान सरकारने शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांची कुचंबना केली आहे. त्यामुळे ४ मार्च रोजी एकत्रीपणे सरकारला ताकद दाखवूया.
दरम्यान शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड, दादा लाड, खंडेराव जगदाळे, सी. एम. गायकवाड, राजाराम वरूटे, दत्ता पाटील, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, अतुल दिघे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.