सीबीएसई साउथ झोन बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन
schedule11 Sep 24 person by visibility 260 categoryक्रीडा
अतिग्रे : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये 2024 च्या सीबीएसई साउथ झोन बॉक्सिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 9 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन दादासो सोपान लवटे, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे खजिनदार एकनाथ चव्हाण, सीबीएसई निरीक्षक अजित कवठेकर, आणि शाळेच्या संचालिका व प्राचार्या सस्मिता मोहंती यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने केले आहे. महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दिव-दमन, केरळ, आणि कर्नाटक येथील 98 सीबीएसई शाळांमधील 365 खेळाडू व त्यांचे 120 प्रशिक्षक या स्पर्धेत सहभाग घेत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंचे कौशल्य आणि परिश्रम दिसून येणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यात दादासो लवटे यांनी खेळाच्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, "खेळ शारीरिक विकासासोबतच मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. खेळातूनच देशाचे नाव जगात उज्वल होऊ शकते."
एकनाथ चव्हाण यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक करताना सांगितले की, "खेळाडूंनी आपले कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवावे. खेळ हे करियर म्हणून पाहावे आणि देशाचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करावा."
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींचे औक्षण करून स्वागत करण्यात झाली. त्यानंतर स्वागतगीत आणि नृत्य सादर करून अतिथींना मानवंदना देत संचलन करण्यात आले. क्रीडा ज्योतीचे पूजन आणि क्रीडाध्वज फडकवल्यानंतर खेळाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, प्राचार्य अस्कर अली, प्राचार्य नितेश नाडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरित कुंभार, मान्या सारडा, आलिया, आर्य, आणि रियान यांनी केले.