विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राची पाहणी
schedule08 Jan 26 person by visibility 170 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज महासैनिक दरबार हॉल येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील स्ट्रॉंग रूम तसेच रमणमळा येथील स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राची पाहणी केली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने उमेदवारी अंतिम झाल्यानंतर प्रचाराला वेग आला असून, मतदानास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत कंट्रोल युनिट स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज संबंधित ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या. तसेच मतमोजणी काउंटरची मांडणी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या ये-जा करण्याची प्रवेश व्यवस्था, मतमोजणी केंद्रापासून कार्यकर्त्यांना थांबविण्याचे अंतर, पार्किंग व्यवस्था तसेच मतदान केंद्रांपर्यंत येणाऱ्या वाहनांच्या नियोजनाबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निऱ्हाळी, प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील, अप्पर निवडणूक निरीक्षक तथा अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भंडारे, उप-आयुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे व आदी अधिकारी उपस्थित होते.

