कोल्हापूर: ५० हजारांची लाच घेताना खासगी इसमासह पोलीस हेड कॉन्स्टेबल जाळ्यात; एसीबीची मोठी कारवाई
schedule28 Apr 26 person by visibility 204 categoryगुन्हे
कोल्हापूर : भुदरगड पोलीस ठाण्यातील एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि जप्त केलेली कार सोडून देण्यासाठी मागितलेली लाचेची रक्कम स्वीकारताना एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष आनंदा चौगले (वय ३९) आणि खासगी व्यक्ती मुस्तफा दस्तगीर शेख (वय ४१) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तक्रारदार यांच्यावर भुदरगड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल सुभाष चौगले यांच्याकडे होता. या तपासात मदत करणे, चार्जशीट व्यवस्थित पाठवणे आणि ताब्यात घेतलेली स्विफ्ट कार सोडून देण्यासाठी चौगले यांनी सुरुवातीला १,००,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत कोल्हापूर एसीबीकडे तक्रार केल्यानंतर या मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान तडजोड होऊन ५०,००० रुपये घेण्याचे ठरले आणि ही रक्कम खासगी इसम मुस्तफा शेख याच्याकडे देण्यास सांगण्यात आले.
एसीबीने रचलेल्या सापळ्यात, मुस्तफा शेख याने तक्रारदाराकडून ५०,००० रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याच वेळी पथकाने त्याला पंचासमक्ष रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. लाचखोरीच्या तक्रारींसाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.