चिल्लर पार्टी महाराष्ट्राबाहेर, गोव्यातील झोपडपट्टीतील मुलांसाठी दाखवणार सिनेमे
schedule28 Jun 22 person by visibility 117 categoryमनोरंजन
चिल्लर पार्टीच्या वतीने निवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत निकाडे यांच्या हस्ते गोव्याच्या स्मिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर : मुलांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच वाड्या वस्त्यावरील मुलांमध्ये प्रबोधन करीत चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आता महाराष्ट्राबाहेरही विस्तारत आहे. लवकरच चिल्लर पार्टीचे काम गोव्यात सुरू होत आहे. गाेव्यातील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठीही चिल्लर पार्टी विनामूल्य सिनेमा दाखवणार आहे.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे यंदाचे दहावे वर्ष आहे. यानिमित्त चिल्लर पार्टीचे काम महाराष्ट्राबाहेर गोव्यात सुरू होत आहे. मूळच्या कोल्हापूरच्या स्मिता संजय पाटील या उत्तर गोव्यात महिला व बाल कल्याण समितीत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेली १२ वर्षे त्या 'आस्था आनंद विहार' या नावाची संस्था म्हापशात चालवतात. स्लम स्कूलचा उपक्रम राबविताना त्या मुलांच्या जीवन कौशल्यावर काम करत आहेत. एमए सोशॅलॉजी आणि एम ए इन एज्युकेशन डेव्हलपमेंटमध्ये शिक्षण घेतलेल्या स्मिता पाटील या कृतीशिक्षणाच्या आग्रही आहेत.
कोल्हापुरात चाललेले चिल्लर पार्टीचे काम स्मिता पाटील यांच्या कानावर गेले आणि त्यांनी तडक कोल्हापूर गाठले व चिल्लर पार्टीचा उपक्रम पाहिला . 'तळागाळातील मुलांसाठी हा उपक्रम गरजेचा आहे.' असे त्या म्हणाल्या. हे काम गोव्यात सुरू करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. त्याप्रमाणे पुढील महिन्यापासून गोव्यात चिल्लर पार्टीच्या सिनेमांची सुरवात होईल. यावेळी चिल्लर पार्टीच्या वतीने निवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत निकाडे यांच्या हस्ते स्मिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
शिवाजी मराठा हायस्कूलचे निवृत्त कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या संकल्पनेतून २०१२ मध्ये ‘चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळी’ला प्रारंभ झाला. या नऊ वर्षात चिल्लर पार्टीने लहान मुलांसाठी विशेषतः दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने सिनेमा दाखवत विविध उपक्रमही आयोजित केले.