SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जजयसिंगपुरात १० ऑक्टोबरला ऊस परिषद ! १५ ऑक्टोबरच्या साखर गळीत हंगामाला 'स्वाभिमानी'चा सक्त विरोधभविष्याची ढाल: जागतिक ओझोन संरक्षण दिनकोल्हापुर महानगरपालिका : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर १५ दिवसांत २२२ जणांवर कारवाईगोकुळ पंचवार्षिक निवडणूक : शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुट्टीकोल्हापुरात महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा; पालकमंत्री आबिटकर यांची मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे मागणी‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये १७ सप्टेंबरला स्वच्छता मोहीमदृष्टिहीन नागरिकांसाठी काम करत असलेल्या संस्थेस निधी द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड‘आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा : डॉ. चाणक्य कुमार झा यांचे आवाहनडीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२६ अंतर्गत राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका या संकल्पनेतून सजावट

जाहिरात

 

गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज

schedule16 Sep 26 person by visibility 164 categoryमहानगरपालिका

◼️अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनात; ३०१ टेम्पो, ७ जेसीबी, ७ डंपर, २ क्रेनसह यंत्रणा सज्ज

कोल्हापूर : घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. विसर्जनाचे कामकाज सुरळीत, सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांतील अडीच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात येत आहेत. चारही विभागीय कार्यालयांच्या सहा.आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रात आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. आयुक्त कार्यालयात आज दुपारी गौरी-गणपती विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. 

यावेळी विसर्जनस्थळी आवश्यक मनुष्यबळ, वाहने, यंत्रसामग्री, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य तयारीचा आढावा घेण्यात आला. शहरातील वारंटी कालावधीतील रस्त्यांवरील पॅचवर्कची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असून, मुख्य रस्त्यांवरील पॅचवर्कची कामे रात्रीच्या वेळेत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

▪️इराणी खण येथे स्वयंचलित यंत्रणा

इराणी खण येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी गुरुवारी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. गणेशमूर्ती संकलन व विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने ३०१ टेम्पो, १३०० हमाल, ७ जेसीबी, ७ डंपर, ८ ट्रॅक्टर, ४ पाण्याचे टँकर, २ बूम, ५ रुग्णवाहिका, ५ साधे तराफे, १० फ्लोटिंग तराफे आणि २ क्रेन अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विसर्जनस्थळी सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आवश्यक साधनसामग्रीसह तैनात करण्यात येणार आहेत. तसेच विद्युत विभागामार्फत विसर्जनस्थळी पुरेशा प्रमाणात मोठ्या लाईटची व्यवस्था करण्यात येत आहे. विसर्जनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येत आहेत.

▪️१६० ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था

पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये विविध ठिकाणी १६० गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात येत आहे. ही सर्व कुंडे शुक्रवारी रात्रीपर्यंत चारही विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी बसवून त्यामध्ये पाणी भरण्यात येणार आहे. पवडी विभागाच्या माध्यमातून नागरिकांनी कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती एकत्रित करून टेम्पोद्वारे वाहतूक करत इराणी खणीमध्ये विसर्जित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

▪️निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र पथके

विसर्जनस्थळाजवळील निर्माल्य संकलनासाठी आरोग्य विभागाच्या वतीने २३ आरोग्य निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी चार कर्मचारी अशा दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच शहरातील १४ प्रमुख विसर्जनस्थळी प्रत्येकी १५ कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तैनात करण्यात येणार आहेत. संकलित करण्यात आलेल्या निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, कसबा बावडा, दुधाळी आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथे स्वतंत्र खड्डे तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी निर्माल्याचे विलगीकरण करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी अवनी, एकटी, वसुंधरा तसेच इतर सेवाभावी संस्थांच्या सुमारे १५० महिला सदस्यांचा सहभाग राहणार आहे.

गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांमध्येच गणेशमूर्तींचे विसर्जन तसेच निर्माल्य कुंडामध्ये निर्माल्य जमा करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, नागेंद्र मुतकेकर, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, डॉ.विजय पाटील, संजय सरनाईक, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, मिलिंद जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सहा.अभियंता अमित दळवी आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes