+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule27 Jun 24 person by visibility 331 categoryउद्योग
🟡 २७ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय सुक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्ताने डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांचा विशेष लेख ...

उद्योगांना लक्ष्मी माळ घालते, अशी एक म्हण आहे, जो सतत उद्योगशील असतो, त्याच्याकडे पैसा, प्रसिध्दी आणि प्रतिष्ठा आपसूकच येत असते.आज २७ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय सुक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग. यालाच मराठीमध्ये कुटीर उद्योग किंवा व्यवसाय म्हंटले जाते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी कुटीरोद्योगांचे महत्व विशद केले होते."सधन असते जीवन अवघे, जगणे उद्योजकांचे" असे वर्णन केले जाते,ते यथार्थच आहे;

 भारतासारख्या प्रगतशील देशात अशा छोट्या उद्योग-धंद्यांना एक स्वतंत्र 'इंडस्ट्रियल सेक्टर' म्हणून मान्यता मिळणे आणि त्या दृष्टीने योजना, कायदे, नियमावली यांची आखणी असणे हे क्रमप्राप्त ठरते. २००६ सालापर्यंत अशा उद्योगांसाठी वेगवेगळे कायदे अस्तित्वात होते, त्यात एकसंधता नव्हती. या उद्योगांना कायदेपालनात विशेष सवलती नव्हत्या, तसेच त्यांच्या डोक्यावर सतत विविध इन्स्पेक्टर किंवा देखरेख अधिकाऱ्यांची टांगती तलवार असायची. २००६ साली सुलभीकरण आणि एकसंधता ही दोन उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून भारत सरकारने सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग विकास आणि संवर्धन कायदा (MSMED ACT ), २००६ हा सर्वंकष कायदा आणला. या कायद्याद्वारे सरकारने लघु उद्योग तसेच शेती आणि ग्रामीण उद्योग या दोन्ही खात्यांचे एकत्रीकरण करून सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग हे नवीन मंत्रालय अस्तित्वात आणले. या कायद्यात उत्पादन क्षेत्रातील प्लांट आणि मशिनरी किंवा सेवाक्षेत्रात इक्विपमेन्टमधील इन्व्हेस्टमेंट जर २५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर सूक्ष्मृ (मायक्रो), २५ लाख ते ५ कोटी पर्यंत लघु (स्मॉल) आणि ५ कोटी ते १० कोटीपर्यंत मध्यम (मिडीयम) उद्योग अशी विभागणी केली आहे. या उद्योगांद्वारा मिळणारे उत्पन्न जरी भारताच्या एकूण उत्पन्नाच्या कमी असले तरी त्यांचा मोठ्या उद्योग-धंद्यांना मिळणारा आधार आणि त्यातून हजारो-लाखो गरीब कष्टकरी समाजातील कामगारवर्गाला मिळणारा रोजगार बघता या उद्योगाचा अर्थव्यवस्थेच्या एकूण उलाढालीत सिंहाचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही.म्हणूनच या उद्योगांना चालना मिळावी, म्हणून या कायद्याने सरंक्षण दिले आहे. 

जर एखादी कंपनी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडून (एमएसएमई) माल किंवा सेवा घेत असेल, तर त्यासाठीचे पेमेंट हे त्या कंपनीला ४५ दिवसाच्या आत करावेच लागेल अन्यथा ती रक्कम चक्रवाढ व्याजासहित परत करावी लागेल, अशी या कायद्यात तरतूद आहे. या व्याजाचा दर बँकरेटच्या तिप्पट असून दरमहा हे व्याज देण्याबाबतही कायदा स्पष्टपणे सांगतो. तसेच, ४५ दिवसांपेक्षा जर कंपनी आणि एमएसएमई उद्योग यांच्यात कमी कालावधी (उदा. ३० दिवस, ४० दिवस ) ठरला असेल, तर कंपनीला त्या कालावधीच्या आत पेमेंट करणे गरजेचे आहे. तसेच कंपनीने दर सहामाहीला MSME -१ या रिटर्नमध्ये अशा उद्योगांच्या पेमेंटची थकीत रक्कम (pending dues) आणि त्यांची कारणे रजिस्ट्रार ऑफ कंपनी यांच्याकडे दाखल करायची आहेत. थोडक्यात, जर तुम्ही सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग/ सेवा या प्रवर्गात बसत असाल तर त्वरित या ऍक्ट खाली रजिस्टर करून रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या ग्राहक कंपनीला कळवणे आणि तुमचे पेमेंट ४५ दिवसांपेक्षा जास्त दिवस थकबाकीत राहत नाही ना याची खातरजमा करणे गरजेचे आहे. यात प्रोफेशनल्स म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट्स, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट , विविध कन्सल्टन्ट सुद्धा रजिस्टर करू शकतात, जेणेकरून ग्राहकांकडून थकबाकी गोळा करणे सुलभ जाते. रजिस्ट्रेशन करणे अगदी सोपे आहे आणि त्याची प्रक्रिया https://msme.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
     जर तुम्ही कंपनी असाल तर आपल्या माल/ सेवा पुरवठादारांकडून लघु, सूक्ष्म किंवा मध्यम उद्योग असल्याचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची प्रत घ्या. पेमेंट टर्म्स काय आहेत हे तपासून जर तो कालावधी ४५ दिवसांपेक्षा जास्त असेल (बऱ्याच कंपन्यांमध्ये ६० किंवा ९० दिवस असतो) तर तो अशा उद्योगांसाठी ४५ दिवसच आहे हे लक्षात घ्या. त्यानुसार काही पॉलिसींमध्ये बदल करावयाचे असल्यास त्या दृष्टीने पावले उचला. MSME -१ हा रिटर्न आर्थिक वर्षाच्या दर सहामाहीला म्हणजेच ३० ऑक्टोबर आणि ३० एप्रिल आधी भरणे अनिवार्य आहे. जर एखाद्या सहामाहीला काहीच dues नसतील, तर NIL रिटर्न मात्र भरता येत नाही. जे dues रिपोर्ट केले आहेत त्या संदर्भात इंटरेस्टची प्रोव्हिजन ताळेबंदात केली जाते आहे, हे पहा. याशिवाय वार्षिक ताळेबंदात एमएसएमई dues ची मूळ थकीत रक्कम आणि व्याज यासंबंधित माहिती देणे अनिर्वाय आहे.  

     या कायद्यानुसार नॅशनल बोर्ड फॉर एमएसएमईची स्थापना करण्यात आली असून या बोर्डवर एमएसएमई उद्योगांना बढावा देणे, त्यासाठीच्या योजना आणि उपक्रम तपासणे आणि एमएसएमई मंत्रालयाकडे तसे सुधारणा अहवाल पाठवणे या जबाबदाऱ्या आहेत. याशिवाय जर एखाद्या एमएसएमई उद्योग आणि ग्राहक यात काही तंटा असेल, तर ते एमएसएमई फैसिलिटेशन कॉउंसिल कडे दाद मागू शकतात. 

हा कायदा दिसायला छोटा असला तरी त्याचे कार्यक्षेत्र मोठे आणि परिणाम फार दूरगामी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. सुक्ष्म,लघु,व मध्यम उद्योगांना चालना व संरक्षण देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे, मात्र या सर्व कायदेशीर सोयीसुविधांबद्दल सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग- व्यावसायिक यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे, मात्र देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे हे उद्योग व्यवसाय दूर्लक्षित आहेत. शासनाने यासाठी पुढाकार घेऊन अशा उद्योगांना प्रेरणा, प्रोत्साहन व प्रसिद्धी द्यावी,ही या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिनाच्या निमित्ताने अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही.आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग टिकून राहण्यासाठी विशेषतः कष्टकरी गरीब, महिला, तरुण आणि असुरक्षित कामगारांना न्याय व सुरक्षितता मिळण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत, या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिनाच्या निमित्ताने व्यावसायिक, उद्योजक व उद्योगपतींना हार्दिक शुभेच्छा..!

✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर 

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशीचे संपादक आहेत.)