त्याग, समर्पणातूनच सर्वोच्च शिखरावर पोहोचता येते : मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.
schedule20 Nov 25 person by visibility 174 categoryक्रीडा
कोल्हापूर: जीवनातील कोणतेही यश लगेच प्राप्त होत नाही. कष्ट, त्याग, प्रेरणा व समर्पण या चतुसूत्रीच्या जोरावरच जीवनात यशस्वी होता येते.
कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्या बरोबर त्याग व समर्पणातूनच सर्वोच्च शिखरावर पोहोचता येते हेच यश फलित असून आपल्या जिद्दीची साक्ष देणारे असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले.
येथील समृद्ध शिक्षणाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजने शालेय राज्यस्तरीय १९ वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले बद्दल गुणवंत खेळाडूंचा आयोजित केलेल्या सत्कार समारंभात मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. बोलत होते. प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, प्रशिक्षक बी. आर. भांदिगिरे, क्रीडा शिक्षक प्रा. बी. पी. माळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्य स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या संस्थेचे, जिल्ह्याचे तसेच विभागाचे नाव उज्ज्वल केलेबद्दल मुख्य कार्यकारीअधिकारी यांनी सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून भविष्यात आपण आणखी मोठ्या पातळीवर चमकून देशाचे नाव उज्ज्वल कराल, अशी सदिच्छा व्यक्त करत खेळाडूंना पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर या मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या जीवनात सर्व काही विकत मिळते. परंतु जिद्द, त्याग, समर्पण सातत्य व दुर्दम्य इच्छाशक्ती शक्ती विकत मिळत नाही. ती आपल्या अंतरंगात असावी लागते. या सर्व गोष्टी आपल्याकडे असतील तर जीवनात कोणीही आपल्याला हरवू शकत नाही याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कार्य करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. आयुष्यात यशाच्या प्रगतीपथावर असताना ध्येयापासून विचलित करणारे, मानसिक त्रास देणारे अनेक जण आपल्याला भेटत असतात परंतु याकडे दुर्लक्ष करून प्राप्त प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द असेल तर यशस्वी होता येते ही मेन राजाराम प्रशालेच्या सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंनी दाखवून दिले आहे. पुरोगामी कोल्हापूरला समृद्ध इतिहास, नैसर्गिक उपलब्धता शैक्षणिक वारसा, क्रीडा परंपरा आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मुलींनी राज्यात सुवर्णपदक प्राप्त करून राज्यात कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग अव्वल असल्याचे दाखवून दिले आहे.कठोर सराव, चिकाटी, संघभावना आणि खेळातील निष्ठा या बळावर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी साध्य केलीत, याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. मेन राजाराम वास्तूतील ऊर्जा, मुलींचे कष्ट, त्यांचे आई-वडील ,शिक्षक, प्रशिक्षक, महालक्ष्मीची ऊर्जा या सर्वातून हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी गौरव उद्गार यावेळी काढले. जिल्हा परिषदेतील शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे काम प्रशासन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व्यक्त करताना प्राचार्य डॉ जी.व्ही. खाडे यांनी प्रशालेचा समृद्ध वैभवशाली शैक्षणिक व क्रीडा वारसा यावेळी अधोरेखित केला.
तसेच खो-खो संघाचा जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय प्रवास व त्यातील कामगिरी याचाही प्राचार्यांनी केला उल्लेख करीत या राज्यस्तरीय व विभागीय स्पर्धेसाठी खासदार श्रीमंत शाहू महाराज व जिल्हा प्रशासन, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, मनापा प्रशासन अधिकारी, पालक, प्रशिक्षक यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख यावेळी केला. क्रीडा शिक्षक बी. पी. माळवे यांनी राज्य स्तरीय स्पर्धेतील खेळाडूंची यशस्वी कामगिरी विषयी माहिती यावेळी सांगितली. कर्णधार अमृता पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा. सुषमा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन यादव यांनी केले. सुवर्णपदक प्राप्त सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन यथोचित गौरव करण्यात आला. सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या पूर्वी प्रशालेच्या वतीने कोल्हापूर शहरातून गुणवंत खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात आली त्याला प्रशालेचे माजी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, प्रतिष्ठित नागरिक, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.