स्वप्नील कुसाळेचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ
schedule18 Aug 24 person by visibility 302 categoryक्रीडा
▪️ ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेची बुधवारी कोल्हापुरात भव्य मिरवणूक
▪️ प्रशासनाच्या वतीने दसरा चौकात होणार जंगी सत्कार
▪️ कावळा नाका येथील महाराणी ताराराणी पुतळा येथून सकाळी नऊ वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ
कोल्हापूर : ऑलिंपिकमध्ये देशाचे नाव उंचावणारा कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
पॅरीस येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कांस्य पदक प्राप्त झाल्यानंतर स्वप्नील कुसाळे पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वप्नील कुसाळे याची बुधवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता स्वागत मिरवणूक व दसरा चौकात सत्कार समारंभ घेण्यात येणार आहे. कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून ते दसरा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीनंतर दसरा चौकात सन्मानपत्र देवून भव्य सत्कार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची रुपरेषा ठरवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत (दूरदृश्यप्रणालीद्वारे) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत तासगावकर, आमदार राजेश पाटील आदी मान्यवर बैठकीमध्ये ऑनलाईन सहभागी झाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त डॉ. के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, क्रीडा अधिकारी अरुण पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले,कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील ऑलिंपिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळे याचे सुपुत्राचे जंगी स्वागत व्हायला हवे. मिरवणूक मार्ग तसेच सत्कार समारंभाचे प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करा. ही मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करा. तसेच आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवा. एलईडी स्क्रीन, फ्लेक्स, कमानी, मिरवणुकीचा रोड मॅप आदी सर्व विषयांबाबतचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, जिल्ह्याचे नाव लौकीक करणाऱ्या स्वप्नील कुसाळे याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. कावळा नाका येथील महाराणी ताराराणी पुतळा येथून मिरवणुकीस सुरुवात होईल. यानंतर पुढे दाभोळकर कॉर्नर ते रेल्वे स्टेशन मार्गे दसरा चौकात मिरवणूक येऊन या ठिकाणी मिरवणुकीची सांगता होईल. दसरा चौकात भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मिरवणूक व सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केले. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेल्या नियोजनातील सर्व बाबींची माहिती त्यांनी दिली.
स्वप्नील कुसाळे यांच्या मिरवणूक प्रसंगी प्रमुख तीन चौकात हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करावी. स्वप्नील कुसाळे यांना बक्षीस जाहीर केलेल्या क्रीडाप्रेमी नागरिकांना त्याचा सत्कार करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या.
स्वप्नील कुसाळे यांचा सत्कार करावयाचा असणाऱ्या संस्था संघटना आणि नागरिकांनी करवीर तहसील कार्यालयात सोमवार 19 ऑगस्ट रोजी कार्यालयीन वेळेत आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गौरव सोहळा झाल्यानंतर शिवाजी पुतळा येथे अभिवादन, आंतरराष्ट्रीय कीर्ती स्तंभ भवानी मंडप येथे अभिवादन, यानंतर श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन स्वप्नील कुसाळे कांबळवाडी कडे प्रयाण करेल, अशी माहिती क्रीडा विभागाने दिली.