महावितरण व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने ५ गावांचा व ठिकपुर्ली फिडरचा वीजपुरवठा सुरळीत
schedule21 Aug 25 person by visibility 547 categoryराज्य

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यात दूधगंगा नदीला आलेल्या पूरामुळे गेल्या दोन दिवसांपासून वाळवा उपकेंद्र ठिकपुर्ली गावठाण फिडरवरील पाच गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरण व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने ५ गावांचा व ठिकपुर्ली फिडरचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
महावितरणचे राधानगरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मोहीम राबवली.
आज दुपारी ३ वाजता शाखा अभियंता सुहास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनस्टाफ सुरज पाटील, विकास पाटील, अक्षय चौगुले, विनोद आळवेकर व सागर शिंदे यांनी बोटीच्या सहाय्याने नदीपात्र ओलांडून काम हाती घेतले. या मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान कृष्णात सोरटे, शैलेश हांडे व प्रीतम पाटील यांनी बोटीद्वारे नदीपात्रातून जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या वीजवाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या काढणे, पाण्याखाली गेलेल्या तारांची दुरुस्ती करणे अशी आव्हानात्मक कामे करून शेवटी फिडरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
महावितरण व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने ही अत्यंत जोखमीची कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने संबंधित गावांमध्ये पुन्हा उजेड परतला आहे.