दुथडी भरून वाहतीये पंचगंगा अन् कोल्हापूरकर मात्र कोरड्या घशाने त्रस्त!
schedule27 Jul 26 person by visibility 109 categoryमहानगरपालिका
▪️महापालिकेचा एकदिवसाआडचा जाचक कारभार तात्काळ बंद करा: किशोर घाटगे
कोल्हापूर : एकतर्फी आणि जाचक पाणीपावठ्यामुळे त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांसाठी एक अत्यंत संतापजनक वास्तव समोर आले आहे. काळम्मावाडी धरणात पाणी कमी असल्याच्या कारणावरून कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. मात्र, प्रत्यक्षात निसर्गाने कोल्हापूरवरकृपा केली असून, सध्या काळम्मावाडी धरण ५० टक्क्यांहून अधिक भरले आहे, तर राधानगरी धरण ९० टक्क्यांपर्यंत भरले आहे. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वीच राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्गही करण्यात आला आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असून पावसाचा जोरही कायम असताना, दुसरीकडे महापालिकेचा हा मनमानी कारभार सुरूच आहे.
विशेषतः 'सी' आणि 'डी' वॉर्डाला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्यावरून सध्या पाणी वाहू लागले आहे. असे असतानाही नागरिकांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. 'उशाला पंचगंगा आणि कोरड घशाला' अशी अत्यंत विदारक आणि संतापजनक परिस्थिती सध्या विशेषतः 'सी' आणि 'डी' वार्डातील नागरिकांची झाली आहे.
पावसाळा जोरात सुरू असताना आणि नद्या दुथडी भरून वाहत असतानाही महापालिका प्रशासनाचा हा अंधळा कारभार थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे खोटे भूत उभे करून सुरू केलेले हे जाचक पाणीपुरवठ्याचे नियोजन कोल्हापूर महानगरपालिकेने त्वरित मागे घ्यावे आणि शहराला दररोज नियमीत पाणीपुरवठा करून जनतेला तात्काळ दिलासा द्यावा, अशी आक्रमक मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी केली आहे.
प्रशासनाने तातडीने या भूमिकेत बदल न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.