संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना डीबीटीसाठी बँक खाते व आधार लिंक करा : उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी
schedule19 Jul 24 person by visibility 465 categoryराज्य

कोल्हापूर :: संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण महाडीबीटी प्रणालीव्दारे करण्याच्या शासनाच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत.
या योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीव्दारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत नसतील त्यांची आधार वैधता होणार नाही, तसेच लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यासोबत संलग्न असणे आवश्यक आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आपले आधारअद्ययावत करावे तसेच आधार क्रमांक बँक खात्यासोबत संलग्न करुन घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी केले आहे.
पात्र लाभार्थ्यांची माहिती महाडीबीटी प्रणालीवर भरुन त्यावर त्यांच्या आधारची वैधता तपासावयाची आहे. आधार क्रमांक बँक खात्यासोबत संलग्न नसल्यास लाभार्थ्यांना त्यांचा लाभ प्राप्त होणार नाही.
त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांनी आपले बँक खाते असलेल्या बँकेत जाऊन आधार क्रमांक बँक खात्यासोबत संलग्न करुन घ्यावा किंवा जवळच्या आधार सुविधा केंद्रात जाऊन आपले आधार अद्ययावत करुन घेण्याची कार्यवाही विनाविलंब करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.