सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने कार्यवाही करावी : शेरसिंग डागोर
schedule13 Aug 26 person by visibility 127 categoryराज्य
कोल्हापूर : मानवी समाजामध्ये सफाई कर्मचारी अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. त्यांच्याबाबतीतील म्हणजेच आर्थिक,सामाजिक तसेच सेवाविषयक प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पहावे आणि त्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत त्याचबरोबर या सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग डागोर यांनी आज दिले.
कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या डागोर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली.या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन,समाजकल्याण सहा. आयुक्त सचिन साळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सफाई कामगारांच्या संदर्भातील राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आणि प्रलंबित प्रकरणांची माहिती घेतली. डागोर म्हणाले,सफाई कर्मचारी हा शहराच्या स्वच्छतेचा महत्त्वाचा आधार असून त्यांच्या श्रमाला सन्मान मिळणे आणि त्यांना सुरक्षित व सन्मानजनक कामाचे वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता मानवी दृष्टिकोनातून पाहावे,कुरुंदवाड नपाने सफाई कामगारांना येत्या आठ दिवसात त्यांच्या मालकी हक्काची घरे द्यावीत,तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींनी सफाई कामगारांच्या अनुषंगाने शासनाच्यावतीने सन 2008 मध्ये काढण्यात आलेल्या जी.आर.ची प्रभावीपणाने अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले .
जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणाले,संबंधित यंत्रणांनी निवृत्त कर्मचाऱ्यांसह 25 वर्षांपुढील सर्व सफाई कामगारांची यादी 15 ऑगस्टपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे पाठवावी तसेच येत्या सोमवार-मंगळवारपर्यंत सीपीआरने सफाई कामगारां संदर्भातील प्रश्नांचे विशेष शिबीराचे (कॅम्प) आयोजन करून निराकरण करावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आणि न.पा. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अध्यक्षांनी दिलेल्या सुचनांनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने कोणतेही प्रश्न प्रलंबित ठेवू नयेत असे स्पष्ट निर्देश दिले. तर समाजकल्याण विभागाकडून एका महिन्याच्या आत जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमध्ये विशेष शिबिरांचे (कॅम्प) आयोजन करण्यात येऊन सफाई कामगारांच्या संदर्भातील प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल अशी माहिती समाजकल्याण आयुक्त सचिन साळे यांनी या बैठकीत दिली .
या बैठकीमध्ये सफाई कर्मचायांच्या वारसा हक्काने नियुक्तीशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांच्या अनुषंगाने लागू असलेल्या शासन निर्णयांचा अभ्यास करून पात्र प्रकरणांमध्ये नियमानुसार तातडीने कार्यवाही करावी. कोणतेही प्रकरण अनावश्यक प्रलंबित ठेवू नये असेही श्री डागोर यांनी यावेळी सूचित केले.
दरम्यान त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी व रास्त मागण्या जाणून घेतल्या . याप्रसंगी सीपीआरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरिता थोरात, सार्व.बांधकाम विभागाचे कार्य. अभियंता क्रांतीकुमार मिरजकर,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार, डॉ.गिरीश कांबळे यांच्यासह सर्व नपांचे मुख्य कार्यकारी अधिकारी-प्रतिनिधी तसेच कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते .