मतदार जनजागृतीसाठी आयोजित "लोकशाही दौड"ला उत्स्फूर्त प्रतिसाद; आम्ही कोल्हापुरी जगात लय भारी, पार करणार 80 टक्केवारी
schedule09 Nov 24 person by visibility 119 categoryसामाजिक
कोल्हापूर : जिल्ह्यात "मिशन 80 टक्क्यांहून अधिक मतदान" हे लक्ष्य गाठण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करुन "आम्ही कोल्हापुरी जगात लय भारी पार करणार 80 टक्केवारी" असा संकल्प करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
पाच हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेल्या लोकशाही दौडचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. मतदार जनजागृतीसाठी आयोजित या "लोकशाही दौड"ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक मिर तारीक अली, विश्व मोहन शर्मा, निडणुक निरीक्षक(पोलीस) अर्णव घोष, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी डॉ. के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप चे नोडल अधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर उत्तर डॉ.संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे आदी उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संजय शेटे यांनी दिलेल्या चला मतदान करुया, या जनजागृतीपर स्टिकर्सचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
आजवरच्या सर्व निवडणुकांमध्ये मतदानात अग्रेसर राहुन कोल्हापूर जिल्हा सजग असल्याचे जिल्हा वासियांनी दाखवून दिले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. तसेच जिल्ह्याची आजवरची मतदानाची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी केले. त्यांनी या दौडमध्ये सहभागी धावपटूंसोबत 10 किलोमीटर अंतर धावून पार केले.
3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर धावणे तसेच 3 किमी चालणे अशा लोकशाही दौड मध्ये विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थित सर्वांना मतदान प्रतिज्ञा ही यावेळी देण्यात आली.
▪️तीन किलोमीटर चालण्याच्या दौडमध्ये निवडणूक निरीक्षकांचा सहभाग
निवडणूक सामान्य निरीक्षक मिर तारीक अली, विश्व मोहन शर्मा, निडणुक निरीक्षक(पोलीस) अर्णव घोष यांनी तीन किलोमीटर चालण्याच्या दौडमध्ये सहभाग घेतला. यावेळी सोबत कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी डॉ. के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनीही ३ किमी चालून मतदारांनी मतदान करण्यासाठी जनजागृती केली.