इचलकरंजीत यूनिटी मार्चला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule09 Nov 25 person by visibility 41 categoryसामाजिक
इचलकरंजी : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित “सरदार@१५० यूनिटी मार्च” पदयात्रेला इचलकरंजीकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या पदयात्रेचा शुभारंभ इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी शिवतीर्थ येथून हिरवा झेंडा दाखवून केला. त्यांनी स्वतः पदयात्रेत सहभागी होत युवकांना सरदार पटेल यांच्या एकतेच्या संदेशाचा प्रसार घरोघरी करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी महानगरपालिका उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल देशमुख, राहुल डोंगरे, कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर आणि महानगरपालिका क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांनी उपस्थितांना सरदार पटेल यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी शपथ दिली.
या उपक्रमात इचलकरंजी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, माय भारत, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि बीएसजी युनिट्स यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
‘मेरा युवा भारत, कोल्हापूर’ (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) या उपक्रमांतर्गत २०२५ हे वर्ष लोहपुरुष सरदार पटेल यांच्या १५०व्या जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात असून, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय यूनिटी मार्च पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
इचलकरंजीतील ही पदयात्रा सकाळी ७.३० वाजता शिवतीर्थ येथून सुरू होऊन गांधी पुतळा, सुंदरबाग परिसर आणि प्रांत कार्यालय मार्गे पुन्हा शिवतीर्थ येथे संपली. पदयात्रेपूर्वी उमेश चौगुले आणि त्यांच्या टीमने देशभक्तिपर गीतांवर सादरीकरण केले. यानंतर शाहीर संजय जाधव यांनी सरदार पटेल यांच्या एकतेच्या संदेशावर आधारित पोवाडा सादर करून वातावरण भारले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, इचलकरंजीचे प्रा. डॉ. सचिन चव्हाण यांनी केले.