निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन हयातीचे दाखले सादर करावेत
schedule18 Nov 26 person by visibility 134 categoryराज्य
◼️जीवन प्रमाण व आधार फेस आरडी ॲपद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र भारमल यांचे आवाहन
कोल्हापूर : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत डिजिटल पद्धतीने हयातीचे दाखले (Digital Life Certificate) सादर करावेत, असे आवाहन केंद्र व राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा कोषागार कार्यालय, कोल्हापूर यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी निर्धारित कालावधीत आपण हयात असल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतन जमा होत असलेल्या बँकेत जाऊन किंवा स्वतःच्या मोबाईलद्वारे जीवन प्रमाण (Jeevan Pramaan) व आधार फेस आरडी ( Aadhaar Face RD) हे
ॲप डाऊनलोड करुन ऑनलाईन हयातीचे दाखले सादर करणे बंधनकारक आहे.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करताना काही अडचणी आल्यास जिल्हा स्तरावर जिल्हा कोषागार कार्यालय, कोल्हापूर येथे अथवा तालुका स्तरावर संबंधित उपकोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान 5 मध्ये सहभागी होऊन ऑनलाईन पद्धतीने हयातीचे दाखले सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र भारमल यांनी केले आहे.