‘पल्स’ वैद्यकीय परिषदेमुळे आरोग्यव्यस्थेचा पाया अधिक बळकट : मंत्री हसन मुश्रीफ
schedule25 Mar 26 person by visibility 126 categoryआरोग्य
🟠 पल्स वैद्यकीय परिषद 2026 विशेष लेख
पल्स वैद्यकीय परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन पुढे येईल. या क्षेत्रात नवनवीन संकल्पना, कार्य करणाऱ्या स्टार्टअप्सलाही परिषदेत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जगभरातून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक परिषदेत येणार आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यवस्थेचा पाया अधिक बळकट करणे शक्य होणार आहे.
भविष्यातील वैद्यकीय शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहणार नाही, तर तंत्रज्ञानाधारित, संशोधनकेंद्रित आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असणे अत्यावश्यक आहे. आज आरोग्य क्षेत्र झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता देणे ही काळाची गरज आहे. यासाठी काही महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत. डिजिटल आणि सिम्युलेशन-आधारित शिक्षण, व्हर्चुअल लॅब्स, थ्री-डी ॲनाटॉमी, सर्जिकल सिम्युलेटर यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल. एआय आणि डेटा ॲनालिटिक्सचा समावेश, रोग निदान, रोग नियंत्रण आणि संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता समजणे अत्यंत गरजेचे ठरेल. संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन, वैद्यकीय महाविद्यालयात रिसर्च लॅब्स, स्टार्टअप कक्ष आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्सशी जोडणी वाढवणे. ग्रामीण व समुदायाधारित प्रशिक्षण, विद्यार्थ्यांनी गावपातळीवर आरोग्यसेवा समजून घेतल्यास त्यांची सामाजिक जाणीव वाढेल. आंतरराष्ट्रीय सहकार्य व एक्सचेंज प्रोग्राम, परदेशी विद्यापीठांशी भागीदारी करून जागतिक दर्जाचे शिक्षण अनुभवण्याची संधी. मल्टिडिसिप्लिनरी दृष्टिकोन, वैद्यकीय शिक्षणासोबत व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि संवाद कौशल्यांचा समावेश. थोडक्यात, भविष्यातील डॉक्टर केवळ उपचार करणारे नसून तंत्रज्ञान जाणणारे, संशोधनप्रिय आणि समाजाभिमुख आरोग्यदूत असावेत, हा राज्य शासनाचा दृष्टिकोन आहे. महाराष्ट्र याच दिशेने वैद्यकीय शिक्षणात बदल घडवून आणत आहे.
🔸डिजिटल हेल्थ आणि डेटा ॲनालिटिक्स
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय वैद्यकीय क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडवू शकते, कारण ती डॉक्टरांच्या कौशल्याला पूरक ठरते. एआयमुळे आजारांचे लवकर आणि अधिक अचूक निदान, एक्स-रे, एमआरआय, सीटी-स्कॅन यासारख्या तपासण्यांचे जलद विश्लेषण आणि उपचाराची योग्य दिशा ठरवणे शक्य होत आहे. त्यामुळे रुग्णाचा वेळ वाचतो, चुका कमी होतात आणि उपचार अधिक परिणामकारक होतात. भविष्यात एआय आधारित रोबोटिक सर्जरी, वैयक्तिकृत उपचार योजना आणि रोगाचा पूर्वानुमान हे मोठे बदल घडवतील. डिजिटल हेल्थ आणि डेटा ॲनालिटिक्स यांचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. डिजिटल नोंदी, ई-हॉस्पिटल प्रणाली, ऑनलाईन रिपोर्ट्स आणि मोबाईल हेल्थ ॲप्स यामुळे आरोग्यसेवा अधिक पारदर्शक आणि सुलभ होते. डेटा ॲनालिटिक्समुळे राज्य शासनाला रोगांचे ट्रेंड, लसीकरणाची गरज, संसर्गाचा प्रसार आणि आरोग्य धोरणांची दिशा अचूकपणे समजते. म्हणजेच, निर्णय हे अंदाजावर नव्हे तर अचूक माहितीवर आधारित घेतले जातात.
🔸आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत सहकार्य
आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत सहकार्याची शक्यता अत्यंत सकारात्मक आणि व्यापक आहे. एक्सचेंज प्रोग्राम, संयुक्त संशोधन प्रकल्प, ऑनलाईन अभ्यासक्रम आणि प्राध्यापक-विद्यार्थी देवाणघेवाण यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान आणि अनुभव मिळेल. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांना यामुळे आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल आणि आपल्या डॉक्टरांना जगभरात स्पर्धा करण्याची ताकद प्राप्त होईल. थोडक्यात, एआय, डिजिटल हेल्थ आणि जागतिक सहकार्य यांची सांगड घातली तर महाराष्ट्राचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्र आधुनिक, अचूक आणि जागतिक दर्जाचे बनू शकते.
संशोधनाला चालना देणे ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण नवीन औषधे, आधुनिक उपचार पद्धती आणि तंत्रज्ञानाची प्रगती ही संशोधनातूनच घडते. यासाठी राज्य शासनाकडून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संशोधन प्रयोगशाळा बळकट करणे, विशेष संशोधन अनुदाने देणे, बायो-डेटा व क्लिनिकल स्टडीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि उद्योग-संशोधन संस्था-शासकीय विभाग यांच्यात सहकार्य वाढवणे अशी ठोस पावले उचलली जात आहेत.
तसेच पेटंट प्रक्रियेसाठी आर्थिक व तांत्रिक मदत, आंतरराष्ट्रीय जर्नल्सशी जोडणी आणि संयुक्त संशोधन प्रकल्प यांना प्रोत्साहन दिले जात आहे, जेणेकरून राज्यातील संशोधन जागतिक स्तरावर पोहोचेल.
🔸"चर्चेपासून कृतीकडे" नेणारी परिषद
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'पल्स' परिषद ही एक मोठी संधी आणि प्रेरणादायी व्यासपीठ ठरेल. या परिषदेमुळे विद्यार्थ्यांना-देश-विदेशातील तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन ऐकण्याची संधी, नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल हेल्थ यांचा प्रत्यक्ष अनुभव, संशोधन पोस्टर सादरीकरण, पेपर प्रेझेंटेशन आणि स्पर्धांमध्ये सहभाग घेणे, इंटर्नशिप, फेलोशिप आणि करिअर नेटवर्किंगच्या संधी आणि स्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रातील मार्गदर्शन म्हणजेच ही परिषद विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणार नाही, तर आत्मविश्वास, दृष्टी आणि जागतिक स्तरावर पुढे जाण्याची प्रेरणा देईल. भविष्यातील डॉक्टर केवळ उपचार करणारे नसून संशोधनप्रिय आणि तंत्रज्ञानसज्ज असावेत, यासाठी ही परिषद महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
थोडक्यात, 'पल्स' परिषद ही "चर्चेपासून कृतीकडे" नेणारी परिषद असेल जिथे निष्कर्ष थेट धोरणात आणि धोरण थेट जनतेच्या हिताच्या उपक्रमात रूपांतरित होईल. 'पल्स' परिषदेचा व्यापक दृष्टीकोन हा केवळ एका वर्षाचा किंवा एका प्रकल्पाचा नाही, तर पुढील काही वर्षांचा आरोग्य रोडमॅप ठरवण्याचा आहे. आम्ही महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राला असे पाहतो की जिथे प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळेल मग तो शहरात राहो किंवा दुर्गम गावात.
🔸महाराष्ट्र : आंतरराष्ट्रीय हेल्थ डेस्टिनेशन
पुढील दशकात आमची स्पष्ट दिशा अशी आहे की, महाराष्ट्राला डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य व्यवस्थेत देशात अग्रस्थानी नेणे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनात राज्याला जागतिक दर्जाचे केंद्र बनवणे, ग्रामीण व आदिवासी भागात मजबूत प्राथमिक आरोग्य सुविधा उभ्या करून आरोग्यसेवेतील असमानता कमी करणे, मेडिकल आणि वेलनेस पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय हेल्थ डेस्टिनेशन म्हणून ओळख मिळवून देणे. स्टार्टअप्स, मेडटेक आणि बायोटेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती घडवून आणणे. या सर्वांचा अंतिम उद्देश एकच आहे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक आधुनिक, तंत्रज्ञानसज्ज, संशोधनप्रधान आणि सर्वसमावेशक बनवणे. 'पल्स' परिषद म्हणजे या प्रवासाची सुरुवात आहे, जिथून पुढील दहा वर्षांसाठी ठोस दिशा आणि आत्मविश्वास मिळेल.
जागतिक आरोग्य संघटनांचा सहभाग हा महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी विश्वास, पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय मान्यता यांचा स्पष्ट संदेश देणारा आहे. जेव्हा अशा नामांकित संस्था आपल्या परिषदेचा भाग होतात, तेव्हा जगाला हे दिसून येते की महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात गंभीरपणे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून काम करत आहे. यामुळे दोन महत्त्वाचे संदेश जातात. पहिला म्हणजे आपली आरोग्य व्यवस्था जागतिक दर्जाची बनवण्याचा आपला निर्धार ठाम आहे. दुसरा म्हणजे- ज्ञान, संशोधन आणि सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यासाठी आपण तयार आहोत.
🔸महाराष्ट्र: भारताचा हेल्थ गेटवे
भारताला आरोग्य क्षेत्रात "ग्लोबल हब" बनवण्याच्या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि नेतृत्व करणारी असेल. आपल्या राज्यात आधीपासूनच जागतिक दर्जाची रुग्णालये, कुशल डॉक्टर, मजबूत वैद्यकीय शिक्षण व्यवस्था, औषधनिर्मिती उद्योग, प्रगत तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसारखी शहरे आधीच आरोग्यसेवा, संशोधन आणि मेडिकल टूरिझमची मोठी केंद्रे बनली आहेत. 'पल्स' परिषदेच्या माध्यमातून आम्ही गुंतवणूक, संशोधन सहकार्य, स्टार्टअप इकोसिस्टीम आणि वेलनेस पर्यटन या सर्व घटकांना एकत्र आणत आहोत. यामुळे महाराष्ट्र केवळ राज्यापुरता मर्यादित न राहता भारताचा हेल्थ गेटवे म्हणून उभा राहू शकतो. जिथे जगभरातून रुग्ण उपचारासाठी, विद्यार्थी शिक्षणासाठी आणि उद्योग गुंतवणुकीसाठी येतील.
🔸महाराष्ट्र शासन तुमच्या संशोधनाला, स्टार्टअप कल्पनांना आणि
*जागतिक संधींना नेहमी पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध*
माझा युवा डॉक्टर आणि संशोधकांना एकच संदेश आहे "फक्त पदवी मिळवणारे डॉक्टर न होता, परिवर्तन घडवणारे डॉक्टर बना." आज वैद्यकीय क्षेत्र अतिशय वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पना यांना स्वीकारणे ही काळाची गरज आहे. आपल्या ज्ञानासोबत संवेदनशीलता, सामाजिक जाणीव आणि सतत शिकण्याची वृत्ती ठेवली तर आपण केवळ चांगले डॉक्टरच नव्हे, तर समाजाचे खरे आरोग्यदूत बनू शकता, महाराष्ट्र शासन तुमच्या संशोधनाला, स्टार्टअप कल्पनांना आणि जागतिक संधींना नेहमी पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध आहे.या परिषदेचा महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांना थेट आणि दीर्घकालीन फायदा होणार आहे. अधिक दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. डिजिटल हेल्थ आणि टेलिमेडिसिनमुळे गावागावात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सहज मिळेल.
औषधनिर्मिती आणि वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, वेलनेस आणि मेडिकल पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आरोग्यविषयक जनजागृती वाढल्याने लोक अधिक सजग आणि निरोगी जीवनशैलीकडे वळतील.
'पल्स' परिषद ही केवळ तज्ज्ञांची किंवा उद्योगांची परिषद नसून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य, रोजगार आणि भविष्याशी थेट जोडलेली एक सकारात्मक चळवळ आहे. एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे जिथे महाराष्ट्र आरोग्य, शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बळावर देशात आणि जगात एक आदर्श राज्य म्हणून उभे राहील.
✍️ शब्दांकन - दत्तात्रय कोकरे
विभागीय संपर्क अधिकारी


