उर्दू साहित्य कला अकादमीचा सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय समारोह उत्साहात
schedule10 Oct 25 person by visibility 62 categoryराज्य

▪️दर्जेदार साहित्यिक, सांगितीक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यास रंगत
मुंबई : महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीला ५० वर्षे पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वरळी डोम येथे ६ ते ८ ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त पुस्तक प्रदर्शन, कवी संमेलन, पत्रकार, कवी, लेखक यांना पुरस्कार प्रदान, सुफी संगीत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
▪️अद्ययावत उर्दू घर उभारणार – अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड माणिकराव कोकाटे
या सोहळ्याचे उद्घाटन अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, मराठी व उर्दू साहित्यिक देवाण घेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे ‘उर्दू घर योजना’ आहे. ही योजना अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. तसेच उर्दू शाळा, वसतिगृहे वाढविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली. उर्दू साहित्य अकादमीची नवीन समिती लवकरच गठित करणार आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींनी समाजउन्नतीसाठी कार्य करताना सर्वसमावेशकता, शिक्षण, भाषेचा विकास आणि संस्कृती संवर्धन यासारख्या मूल्यांची परंपरा निर्माण केली. त्यांच्या विचारांच्या प्रभावामुळेच उर्दूसह सर्व भाषांना महाराष्ट्रात मानाचे स्थान लाभले. या आदर्शांच्या प्रेरणेनेच आज उर्दू भाषेचा सुवर्ण महोत्सवी प्रवासाचा सोहळा संपन्न होत आहे. उर्दू ही फक्त भाषा नाही, ती संस्कृतीचा सुगंध, विचारांचा सेतू आणि आत्म्याचा आवाज आहे.
मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले की, ४५० पेक्षा जास्त साहित्य कार्यक्रम, २५० हून अधिक कवी संमेलने, १५० पेक्षा जास्त कार्यशाळा आणि १०० हून अधिक पुस्तक प्रकाशनांनी उर्दू साहित्याची परंपरा समृद्ध केली आहे. २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांत अकादमीने कार्यक्रम घेत ग्रामीण भागातील उर्दूप्रेमींपर्यंत साहित्य पोहोचवले आहे. उर्दू ही भारतीय भाषा असून सुमारे सात कोटी लोक ती प्रथम भाषा म्हणून आणि १० कोटी लोक द्वितीय भाषा म्हणून वापरतात. महाराष्ट्रात सात टक्के लोक उर्दू बोलतात, तसेच जवळपास २५ पेक्षा अधिक उर्दू दैनिके कार्यरत आहेत.
उर्दू घर योजनेंतर्गत नांदेड, मालेगाव, जळगाव, सोलापूर, नागपूरमध्ये ‘उर्दू घर’ उभारणी सुरू आहे. महाराष्ट्रातील १८०० उर्दू शाळात नऊ लाख विद्यार्थांना उर्दू शिकविले जाते. ‘उर्दू लर्निंग ॲप’ द्वारे दरवर्षी ५०,००० विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाते. तीन वर्षांत १०० जिल्हास्तरीय साहित्य संमेलने घेतली गेली.
अल्पसंख्याक महिला व युवकांना प्रशिक्षण, शैक्षणिक प्रोत्साहन देणे अशा अनेक योजना अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून सुरु आहेत. उर्दू साहित्य अकादमीसह एकूणच अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांसाठी अतिरिक्त विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मंत्री ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री अनिज अहमद, आमदार सना मलिक, माजी आमदार ईशान सिद्दिकी, पंजाबी साहित्य अकादमीचे अध्यक्ष मार्क सिंह, ‘औकाफ बोर्ड’चे अध्यक्ष समीर काझी, पटकथा लेखक जावेद अख्तर, विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, आयुक्त प्रतिभा इंगळे, सचिन पिळगावकर, रुमी जाफरी, शेखर सुमन, नईम एजाझ, सरफराज आरजू यांच्यासह अधिकारी, कलाकार आणि साहित्यिक उपस्थित होते.
यावेळी उर्दू सिके आणि मराठी शिकूया अशा दोन पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
▪️उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवाचा सोहळा
सचिव रुचेश जयवंशी म्हणाले की, मराठी साहित्याचे उर्दू भाषेत आणि उर्दू साहित्याचे मराठी भाषेत भाषांतर करून मराठी व उर्दू भाषेतील सृजनशीलता वाढविण्याच्या उद्देशाने माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७५ मध्ये या अकादमीची स्थापना केली. दोन्ही संस्कृतीची आणि साहित्याची देवाण घेवाण करणे तसेच उर्दू साहित्याचे जतन, संवर्धन करण्यासाठी उर्दू साहित्य कला अकादमी कार्यरत आहे. नाट्यमहोत्सव, पुस्तके, पत्रकार, ग्रंथालय , लेखक, कवी, यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश अकादमीचा आहे.
गत चार वर्षातील २०० लेखक, कवी आणि ४८ पुस्तकांच्या लेखकाना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये नवोदित साहित्यिकांना पुरस्कार, नवोदित लेखकाना पुरस्कार, पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नवोदित कवींचे कवी संमेलन, उर्दू नाटक, वाली दाकनी अवॉर्ड, मिर्झा गालिब अवॉर्ड, महाराष्ट्र मे उर्दू अदब, मॉर्डन टेक्नॉलॉजी अँड उर्दू अशा विविध साहित्यिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढली होती.