कोल्हापुरात १८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन; हद्दवाढीसह विविध प्रकल्पांना गती
schedule09 Aug 26 person by visibility 169 categoryराज्य
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर शहरातील १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमात कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून, हद्दीबाहेरील लोकांच्या अडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ आणि विविध मंत्री व मान्यवर उपस्थित होते.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचेलोकार्पण
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या आणि दोन वर्षांपूर्वी आगीत भस्मसात झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे वारसामूल्य जतन करून पुननिर्माण करण्यात आले आहे. १४ ऑगस्ट १९१५ रोजी सुरू झालेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी राज्य सरकारने २५ कोटी रुपये दिले होते. १४१ व्या जयंतीनिमित्त या ऐतिहासिक वास्तूचे पुन्हा दिमाखात लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरच्या समृद्ध नाट्य, चित्रपट आणि संगीत परंपरेचा गौरव केला.
आरोग्य व पायाभूत सुविधांचा विकास
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे (सीपीआर) वारसा स्वरूप जतन करून आधुनिकीकरण करण्यात आले असून, यात ८ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, बर्न वॉर्ड आणि डायलिसिस सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच शेंडा पार्कमध्ये अमेरिकेच्या 'ह्यूस्टन' शहराच्या धर्तीवर मेडिकल हब उभारण्यात येत असून, यात ६०० बेडचे सामान्य, २५० बेडचे कर्करोग आणि २५० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय साकारले जात आहे. यामुळे कोल्हापूरसह कर्नाटक व कोकणातील नागरिकांना उपचारासाठी मुंबई-पुण्याला जावे लागणार नाही.
पोलिसांसाठी घरे व क्रीडा सुविधा
राज्यातील पोलिसांसाठी ५० हजार घरांच्या नियोजनांतर्गत कोल्हापुरात महाराणी ताराराणी पोलीस गृहसंकुलात आणि इचलकरंजी मिळून ४१४ सदनिका पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच खेलो इंडिया योजनेतून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे ६ कोटी ९६ लाखांच्या खर्चातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऍस्ट्रोटर्फ मैदान विकसित करण्यात आले आहे. याशिवाय कोल्हापुरात आधुनिक क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पूरनियंत्रण आणि इतर विकासकामे
कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरस्थितीवर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र रेझिलिएन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पूर नियंत्रणासह अतिरिक्त ३५ ते ३६ टीएमसी पाणी डायव्हर्शन कॅनलद्वारे दुष्काळी भागाकडे वळवले जाणार आहे. तसेच राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, रंकाळा तलाव कारंजे, अंबाबाई मंदिर परिसर विकास, बहुमजली पार्किंग आणि ४८४ कोटींच्या रस्त्यांच्या कामांचेही यावेळी लोकार्पण झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर रूपाराणी निकम यांनी केले, तर आभार महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी मानले.